मुंबई: स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून आता केंद्र आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालय महाराष्ट्राची तयारी असूनही कमी रेल्वेगाड्या सोडत असल्याची तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांचा हा आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे पियूष गोयल सध्या अक्षरश: इरेला पेटले आहेत. या वादात आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी १२५ श्रमिक ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धवजी महाराष्ट्रात १२५ ट्रेन पाठवतोय, फक्त रिकाम्या परत पाठवू नका- पियूष गोयल

स्वत:चे अपयश लपविण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे. सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करतच राहणार, असेही फडणवीस यांनी सांगितले. कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे सांगत त्यांनी चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


कोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री

आज संध्याकाळी पियूष गोयल यांनी ट्विट सोमवारी महाराष्ट्रासाठी १२५ ट्रेन सोडायला तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र सरकारने एका तासाच्या आत मजुरांची यादी आणि आवश्यक तपशील पुरवावा, असे त्यांनी म्हटले होते. यावर राज्य सरकारने यावर कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले आहे की, दीड तास उलटून गेला तरी महाराष्ट्र सरकारने उद्या सोडण्यात येणाऱ्या १२५ श्रमिक ट्रेनसाठी आवश्यक तपशील पुरवलेला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर या ट्रेन्सचे नियोजन करायला वेळ जातो. आम्हाला गेल्यावेळप्रमाणे महाराष्ट्रातून रिकाम्या रेल्वे परत आणायच्या नाहीत, असा टोला गोयल यांनी लगावला. यादरम्यान रेल्वे मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये गेल्यावेळी महाराष्ट्र सरकारची तयारी नसल्यामुळे ६५ श्रमिक ट्रेन रद्द कराव्या लागल्याचे नमूद करण्यात आले आहे.