कोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला.

Updated: May 24, 2020, 03:56 PM IST
कोरोनाबद्दलचा 'दिल्ली'चा अंदाज चुकवला, पण धोका कायम- मुख्यमंत्री title=

मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता. आज ३३ हजार ७८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर एकूण आकडा ४७ हजार आहे. जवळपास १३ हजार कोरोनामुक्त झाले आहेत, पण धोका अजूनही टळलेला नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. 

पुढील लढाई अधिक बिकट होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार आहेत पण घाबरण्याचे कारण नाही आहे. आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करत आहोत, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. 

कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे, पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. सध्या ७ हजार, तर मेअखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील. जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे लक्षात आलं, फिल्ड हॉस्पिटलमध्ये तशी सोय करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावं, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

पावसाळ्यात विनाकारण भिजणे शक्यतो टाळा, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायला हव्या, पाणी उकळून प्या. सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशी नवे लक्षणेही, ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.