... रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या `त्या` बकरीचा अखेर २५०० हजाराला लिलाव
सुरुवातीला या बकरीसाठी तीन हजार रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली होती.
मुंबई: विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीने सीएसटीएम स्थानकावर सोडून दिलेल्या बकरीचा अखेर लिलाव करण्यात आला आहे. रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याने ही बकरी विकत घेतली. सुरुवातीला या बकरीसाठी तीन हजार रुपये इतकी मूळ किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, बुधवारी झालेल्या लिलावादरम्यान कोणीही या बकरीला विकत घेतले नव्हते. अखेर रेल्वेच्या पार्सल विभागात काम करणाऱ्या अब्दुल रेहमान या कर्मचाऱ्याने २५०० रुपयांची बोली लावून ही बकरी विकत घेतली.
मंगळवारी घडलेल्या एका प्रसंगामुळे या सर्व घटनाक्रमाची सुरुवात झाली. सीएसटीएम स्थानकावरील फलाटावरुन एक व्यक्ती जात होता. त्याच्यासोबत एक बकरी होती. स्थानकाच्या बाहेर जाताना टीसी राम कापडे यांनी या व्यक्तीला तिकीटाची विचारणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने सुरुवातीला खिशात तिकीट शोधण्याचे नाटक केले.
त्यानंतर टीसीचे लक्ष नाही हे बघताच गर्दीत धूम ठोकली. मात्र, तो व्यक्ती त्याच्यासोबतच्या बकरीला तेथेच सोडून गेला. थोड्यावेळासाठी टीसीलाही आता या बकरीचे करायचे काय, असा प्रश्न पडला.
अखेर लोकांनी सल्ला दिल्यानंतर टीसी या बकरीला सीएसटीएमवरील लगेज रुममध्ये घेऊन गेला. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर रेल्वेच्या नियमानुसार या बकरीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या लगेज रुमबाहेरच्या परिसरात या बकरीला ठेवण्यात आले आहे.
रेल्वेचे सर्व कर्मचारी या बकरीची काळजी घेत होते. ही बकरी याठिकाणी कोणत्याही त्रासाविना राहत होती. लगेज रुमबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला तिला आवडते, अशी तिची काळजी घेणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.