Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या आयडियाथॉन- 1.0 ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आणि यशानंतर विद्यापीठामार्फत आयडियाथॉन- 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना पाठबळ देऊन स्टार्ट-अपमध्ये रुपांतर केले जाणार आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि मेक्सिकोचे काऊंसल जनरल एडाल्फो गर्सिया इस्ट्राडा यांच्या हस्ते करण्यात आले.


विद्यापीठाच्या परिक्षेत्रात 47 स्टार्ट-अप क्लिनीक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या उपक्रमाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे विद्यापीठाच्या परिक्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या 47 स्टार्ट-अप क्लिनिकच्या माध्यमातून पहिल्या स्तरावर सादरीकरण होणार आहे. व त्यातून निवडक प्रस्तावांचे अंतिम सादरीकरण विद्यापीठाच्या ‘एमयु आयडियाज फाऊंडेशन-इन्क्युबेशन सेंटर’ येथे केले जाणार आहे. उत्कृष्ट ठरणाऱ्या विविध नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन आणि पाठबळ दिले जाणार आहे. यापूर्वी विद्यापीठामार्फत ‘एमयु आयडीयाज फाऊंडेशन- इन्क्युबेशन सेंटर’ च्या विविध उपक्रमांची माहिती तथा विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहाय्य करण्यासाठी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात 47 स्टार्ट-अप क्लिनीक सुरु करण्यात आली आहेत. आयडियाथॉन- 2.0 च्या माध्यमातून विद्यापीठाच्या स्टार्ट-अप क्लिनिकना एकप्रकारे बळकटीसाठी हातभार लागणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.


मुंबई विद्यापीठाने यापूर्वी आयडियाथॉन- 1.0 या उपक्रमाला सुरुवात केली होती. यामध्ये  संपूर्ण भारतातून एकूण 62 उद्योजकपुरक नवोपक्रम प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 10 प्रस्तावांचे स्टार्ट-अप मध्ये रुपांतर करण्याकरीता  ‘एमयु आयडियाज फाऊंडेशन-इन्क्युबेशन सेंटर’मध्ये नोंदणी करून घेण्यात आली आहे. लवकरच या प्रस्तावांचे स्टार्ट-अपमध्ये रुपांतराची प्रक्रिया सुरु असल्याचे नवोप्रक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांनी सांगितले.


मुंबई विद्यापीठात 2019 ला स्थापन झालेल्या ‘एमयु आयडियाज फाऊंडेशन-इन्क्युबेशन सेंटर’ ला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मार्फत रुपये पाच कोटीचे अर्थसहाय्य मंजूर झालेले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नवप्रतिभावंतांच्या संकल्पनांचे नवउद्योगांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.  यावेळी नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. सचिन लढ्ढा, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संचालक प्रा. बी. व्हि. भोसले आणि ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार उपस्थित होते. आयडियाथॉन 2.0 मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृत या लिंकचा वापर करता येणार आहे. याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत या उपक्रमात सहभागी होता येईल.


आयडियाथॉन 2.0 मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा


उनाम मेक्सिको कॉर्नरचे उदघाटन


मुंबई विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्रांत नुकतेच उनाम (UNAM) मेक्सिको कॉर्नरचे उद्घाटन करण्यात आले. उनाम लॅटिन अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था असून ‘युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिडॅड नॅशिओनल ऑटोनोमा डी मेक्सिको’ (UNAM) या नावाने ती ओळखली जाते. मुंबई विद्यापीठातील उनाम मेक्सिको कॉर्नरच्या माध्यमातून मेक्सिकोच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचे प्रतिबिंबित करणारी पुस्तके, जर्नल्स आणि ई-संसाधनांसह विस्तृत शैक्षणिक सामग्री क्यु-आर कोडच्या माध्यमातून सर्व शिक्षणतज्ञ, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. उनाम मेक्सिको कॉर्नरच्या माध्यमातून मेक्सिकन अभ्यासासाठीचे, दोन राष्ट्रांमधील क्रॉस-डिसिप्लिनरी संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणांना प्रोत्साहन देईल. त्याचबरोबर लॅटिन अमेरिकन अभ्यास, मेक्सिकन अभ्यास, स्पॅनिश भाषा आणि साहित्य, जागतिक संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. मुंबई विद्यापीठ आणि उनाम यांच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.