शिवसेना-भाजपमध्ये सगळं काही खरंच आलबेल आहे का?
शिवसेना-भाजपमध्ये सगळं काही खरंच आलबेल आहे का?
१६ जूनपासून पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबई: शिवसेना आणि भाजपामध्ये सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. विधानसभा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. यामध्ये आता लोकसभा उपाध्यक्षपद पदरात पाडून टाकण्यासाठी शिवसेनेने दबावतंत्र वापरायला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात उद्धव यांनी 'आमचं ठरलंय... युती तुटणार नाही', असे म्हटले होते. यावरून शिवसेना-भाजपमध्ये सगळे आलबेल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तरीही 'सामना'मधून भाजपविरोधात पुन्हा टीकेचा सूर आळवला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
शिवसेनेचे १८ खासदार निवडून आलेले असताना केवळ एका मंत्रीपदावर शिवसेनेची वर्णी लागली. त्यातही अवजड उद्योगसारखं अडगळीतलं खातं देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेची नाराजी कायम असल्याचे समजते. त्यामुळेच की काय, १६ जूनपासून पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. राममंदिरासाठी दबाव आणून लोकसभा उपाध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची खेळी तर नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातून काहीही साध्य होणार नाही, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले असले तरी त्यांचा बोलवता धनी भाजपातला तर नाही ना, अशी शंका राजकीय वर्तुळातून उपस्थित केली जात आहे. शिवसेनेचे टीकास्त्र बोथट करण्याची ही भाजपाची खेळी असल्याचे मानले जाते.
विधानसभा जागावाटपावरून भाजपाचे मंत्री दररोज वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बिहारमध्ये नीतीशकुमार यांच्या जेडीयूनं भाजपाला शिंगावर घेण्याची भूमिका घेतलीय. तर महाराष्ट्रात तोच कित्ता शिवसेना गिरवताना दिसतेय. त्यामुळे युतीत धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.