पुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन...

महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील मनाला सुन्न करणारी बाब म्हणजे ज्यांच्याकडे आपण रक्षक म्हणून पाहतो त्या पोलिसाकडूनच हा घृणास्पद प्रकार घडला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 26, 2024, 01:03 PM IST
पुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन... title=

पुणे पुन्हा एकदा हादरलं! लोणावळ्याच्या पोलिसाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला आहे. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केलेत.

पोलिसाने केलेल्या या घृणास्पद प्रकाराचा तीव्र निषेध केला जात आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केलेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार नाताळच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी घडला आहे.

नेमकं काय घडलं? 

नाताळची सुट्टी असल्याने पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली अन त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला अन चिमुकलीसोबत अश्लील चाळे करु लागला. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन या नराधम पोलीस सस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

अल्पवयीन मुलीच्या आईची मागणी 

अल्पवयीन मुलगी हॉटेलच्या मागे खेळत होती. त्यावेळी या पोलिसाने हा प्रकार केला. माझ्या मुलीने येऊन हा सगळा प्रकार सांगितला. जर पोलिसच असं करत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने विचारला आहे. 

राजगुरुनगरमध्ये देखील घडला प्रकार

पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दोन चिमुकल्या अल्पवयीन मुलींची अत्याचार करून निघृरपणे हत्या केल्यानंतर संतप्त स्थानिक आंदोलन करत आहेत. राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात आलं असून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आमच्या हवाली करा अशी मागणी या आंदोलक महिलांनी करत राजगुरूनगर पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय..