`असदुद्दीन ओवैसी आणि माझ्यात थेट बोलणी; शेवटच्या दिवसापर्यंत युतीची शक्यता`
काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेत असल्याचे जाहीर केले होते.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत युती करायची की नाही, याबद्दल असदुद्दीन ओवैसी आणि माझ्यात थेट बोलणी सुरु आहेत. उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील युतीची शक्यता कायम असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत अजूनही बोलणी सुरु असल्याचा खुलासा केला. काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी 'आमची आघाडी ओवैसींसोबत झालीये, महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झालेली नाही' असे सांगत इम्तियाज जलील यांना टोला लगावला होता.
इम्तियाज जलील यांनीदेखील प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले होते. मी प्रदेशाध्यक्ष असून मलादेखील काही अधिकार आहेत. मी असदुद्दीन ओवैसी यांना विचारून निर्णय घेतल्याचा दावा जलील यांनी केला होता.
राज्यातील नेत्यांसोबत नव्हे तर ओवेसींसोबत आमची आघाडी - आंबेडकर
मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा फेटाळून लावला. असदुद्दीन ओवेसी आणि माझ्यात थेट बोलणी सुरु आहेत. आम्ही एकमेकांना जागांची यादी दिली आहे. त्यामुळे दुसरे काय बोलतात, यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. या चर्चेत अडथळा येऊ नये, एवढीच दक्षता आम्ही घेत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीशी आमची युती तुटली - इम्तियाज जलील
तसेच विधानसभा निवडणुकीतील युतीसाठी काँग्रेसशी युती करण्याचे दरवाजे आता आपण बंद केल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.