औरंगाबाद : वचिंत बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील आघाडी तुटल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची आघाडी कायम आहे असे त्यांनी म्हटले आहे. एमआयएम सोबतची आमती युती महाराष्ट्रातल्या नेत्यांशी झालेली नाही तर ओवेसींसोबत झालेली आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची माणस हैद्राबादवरून आमच्याकडे आली. त्यानंतर ते आता ओवेसीकडे निरोप घेऊन गेल्याचेही आंबेडकर म्हणाले.
यावेळी त्यांनी सध्या वादात असलेल्या गडकिल्ल्यांच्या मुद्द्यालाही हात घातला. या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी गडकिल्ले विकायला काढले आहेत. हे दारुड्यांचे सरकार असल्याचा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीने भल्याभल्यांना घाम फोडला होता. इतकेच नव्हे तर औरंगाबाद मतदारसंघातही एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. या आघाडीने राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची धुळधाण उडवली होती. त्यामुळे अशोक चव्हाण, सुशीकुमार शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम काय कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, जागवाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच धुसफूस सुरु होती. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती. यानंतर एमआयएमच ७५ आणि शेवटी ५० जागांवरही लढायची तयारी दर्शविली होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्याच मागण्यांना केराची टोपली दाखवली. प्रकाश आंबेडकर एमआयएमला फक्त आठ जागा द्यायला तयार होते.
एमआयएमच्या वाट्याला २८८ पैकी फक्त ८ जागा देण्यापासून सुरूवात झाली. ज्यावर आपण काही जास्त बोलू शकत नाही, पण औवेसी यांनी युती तोडण्याची घोषणा करण्याचं आपणास सांगितल्याचं इम्तियाज यांनी म्हटलं होते. मी प्रदेशाध्यक्ष असून मलाही काही अधिकार आहेत. पण चर्चेतून अजूनही काही मार्ग निघत असेल तर आमची तयारी असल्याची प्रतिक्रिया इम्तियाज जलिल यांनी दिली आहे.