वंचित बहुजन आघाडीशी आमची युती तुटली - इम्तियाज जलील

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत आता आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.

Updated: Sep 8, 2019, 12:13 AM IST
वंचित बहुजन आघाडीशी आमची युती तुटली - इम्तियाज जलील title=

औरंगाबाद : एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत आता आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घेतला असल्याचं एका कार्यक्रमात जाहीर केलं. 

एमआयएमच्या वाट्याला २८८ पैकी फक्त ८ जागा देण्यापासून सुरूवात झाली. ज्यावर आपण काही जास्त बोलू शकत नाही, पण औवेसी यांनी युती तोडण्याची घोषणा करण्याचं आपणास सांगितल्याचं इम्तियाज यांनी म्हटलं आहे.

तर आघाडीसंदर्भात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हेच अंतिम निर्णय घेणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी केलाय. जलील म्हणजे ओववैसींसाठी नाकापेक्षा मोती जड झालाय, अशी टीकाही सचिन माळी यांनी केलीय.

निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया

एमआयएमचा वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलीय. नागपूरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमआयएमचा एकमेव खासदार पक्षाच्या तिकिटावर निवडून आला असून, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं कोणतही योगदान नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलीय.