मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु होती. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत' असं म्हणत त्यांनी 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.' अशा शब्दात टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांत सिंहला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं रोहित पवार म्हणाले. तसंच सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत', म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.



दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन खोचक टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र सरकार  या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे देण्यात आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाप्रमाणे  होऊ नये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर पवारांची खोचक टिप्पणी