नवी दिल्ली : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी आपली रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून कारकीर्द उत्तम झाली असल्याचं म्हटलं आहे. रघुराम राजन सप्टेंबर महिन्यात पायउतार होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टीकाकारांनी माझ्या कारकिर्दीबद्दल व्यक्त केलेली मते दखल घेण्याजोगी नाहीत. मी माझ्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, आणि येत्या ५ ते ६ वर्षांत त्याचा निकाल दिसून येईल, असंही राजन यांनी म्हटलं आहे. 


राजन यांनी व्यक्‍त केलेले मत अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. कारण राजन यांना भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी विशेष लक्ष्य केले होते. आरबीआयकडून सुरुवातीला रेपो रेट जास्त ठेवण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याची टीका स्वामी यांच्याकडून करण्यात आली होती. 


राजन म्हणाले, अखेर मी माझ्याकडून आपण भरीव योगदान दिले आहे आणि त्याचा लोकांना फायदा होणार आहे, अशी वाटणे हेच खरे म्हणजे सर्वांत महत्त्वाचे आहे. मला वाटते, या दृष्टिकोनामधून विचार केला असता आरबीआय गव्हर्नर म्हणून माझी कारकीर्द उत्तमरित्या पार पडली आहे.


टीकारांविषयी बोलताना राजन म्हणाले, 'टीकाकार वा समर्थकांनी यासंदर्भात व्यक्‍त केलेली मते ही फारशी महत्त्वपूर्ण नाहीत. अंतिमत: देशाच्या शाश्‍वत आणि बलिष्ठ विकासासाठी, रोजगार निर्मितीसाठी आरबीआय गव्हर्नर म्हणून मी घेतलेले निर्णय कशा प्रकारे परिणामकारक ठरतील, ते पाहणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात पाच-सहा वर्षांच्या अनुभवानंतरच निश्‍चित मत व्यक्‍त करणे योग्य ठरेल. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये घेण्यात आलेले निर्णय हे योग्यच होते, अशी आमची धारणा आहे.