मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर घटक पक्षाच्या नेत्यांची हजेरी लावत भाजपवर निशाणा साधला होता. 
या प्रसंगानंतर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलविल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीच्या नावाने शंख फुंकणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. ही उपस्थिती हजेरीपूर्वी नव्हती तर हे ‘संबंध’ असेच राहिले तर पुढील विधानसभा एकत्र लढवू, तुम्ही किंगमेकर व्हा, असा शब्दही जानकरांनी दिला. 


भाजपच्या घटक पक्षांची ही आगामी निवडणुकीपूर्वीची दिलजमाई आहे, की मंत्रिपदासाठी भाजपला दिलेला गर्भित इशारा, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेय. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. आज रात्री ८वाजता मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भाजप आणि मित्रपक्षांची बैठक होत आहे. 


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी पुण्यातून सद्भावना यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ३६ आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली़ यानिमित्ताने अजित पवार यांच्यासोबत जानकर, मेटे, आणि खोत एकत्र आल्याने राजकीय चर्चा जोरदार होत आहे.


भाजपविरोधात नाराजीचा सूर लावताना काँग्रेस आणि भाजप एका माळेचे मणी आहेत ते काय करतील याचा नेम नाही. प्रसंगी शिवसेनेची सत्ता आली तरी चालेल, पण भाजपला धडा शिकवला पाहिजे, अशा इशाराच त्यांनी यावेळी दिला. याची धास्ती मुख्यमत्र्यंनी घेतल्याचे दिसत आहे. शिवसंग्रामचे मेटे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे युतीची महायुती झाली़ समान मुद्द्यांवर संमती झाली होती़ मंत्रिमंडळातील समावेशाचे आश्वासन दिले होते ते आता पूर्ण होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.