Yuzvendra Chahal Comment After Dropped: आशिया चषक 2023 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघातून मागील अनेक महिन्यांपासून जयबंदी झाल्याने बाहेर असलेल्या अनेक खेळाडूंना पुन्हा संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही काही खेळाडूंच्या नशिबी पुन्हा निराशाच आली आहे. संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहलचाही समावेश आहे. आशिया चषक 2023 च्या भारतीय संघामधून 33 वर्षीय चहलला वगळण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.


चहलची पोस्ट काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवड समितीने डच्चू दिल्यानंतर चहलने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या चहलने भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर इमोजींच्या माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवली आहे. चहलने ट्विटरवरुन दुपारी 4 वाजून 46 मिनिटांनी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने पहिला इमोजी हा ढगाआड लपलेला सूर्याचा आहे. या इमोजीकडून समोरच्या बाजूला बाण दाखवत पुढे हसणाऱ्या आणि संपूर्ण आकाराच्या सूर्याचा इमोजी चहलने वापरला आहे. या ट्वीटमध्ये चहलने एकही अक्षर लिहिलेलं नाही. मात्र त्यामधून काय तो सूचक संदेश त्याने दिला आहे.


चहलला काय म्हणायचं आहे?


चहलच्या या पोस्टमधून त्याने सूचक पद्धतीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सध्या आपला वाईट काळ सुरु असला तरी लवकरच आपण दमदार पुनरागमन करु असं चहलला यामधून सांगायचं आहे. आता सूर्य ढगांआड असला तरी लवकरच तो तळपताना दिसेल, असं चहलला यामधून सांगायचं असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.


नक्की पाहा >> Video: विराटसंदर्भातील रोहितचं 'ते' विधान ऐकून Chief Selector आगरकरसहीत सगळेच हसू लागले



अनेकांनी चहलला दिला धीर


चहलची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच तू मैदानात दिसशील, तुला फार साऱ्या शुभेच्छा, तुला संघात स्थान द्यायला हवं होतं, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवर नोंदवल्या आहेत. 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे.


नक्की वाचा >> Asia Cup स्पर्धेत Mumbai Indians चा संघ भारताकडून खेळणार! सोशल मीडियावर टीकेची झोड


असा आहे भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा राखीव खेळाडू- संजू सॅमसन