Asia Cup 2023 Rohit Sharma And Virat Kohli: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघांची घोषणा आज मुंबईमध्ये झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर आगरकर आणि संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये आगामी विश्वचषक 2023 संदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. एका प्रश्नाला उत्तर देताना तर रोहित शर्माने थेट विराट आणि मी वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करु असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून एकच हशा पिकला. मात्र रोहित असं नेमकं का म्हणाला?
17 खेळाडूंच्या संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरु होत आहे. संघाची घोषणा झाल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रोहित शर्माने विराट आणि त्याच्यासंदर्भात मजेदार विधान केलं. 17 खेळाडूंमध्ये मनगटाच्या सहाय्याने चेंडू फिरवण्याची शैली अवगत असलेला कुलदीप यादव हा एकमेव खेळाडू असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं. गोलंदाजीसंदर्भात खोचक प्रतिक्रिया नोंदवताना रोहितने, "अपेक्षा आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली विश्वचषकामध्ये गोलंदाजी करतील," अशी प्रतिक्रिया नोंदवली. हे विधान ऐकून रोहितच्या शेजारी बसलेल्या अजित आगरकर यांनाही हसू अनावर झालं. तसेच सर्वच पत्रकारही हसू लागले. अजित आगरकर यांनीही मस्करी करत, "आम्ही त्यांना नक्कीच प्रोत्साहन देऊ" असं सांगितलं. मुळात या विधानामधून रोहित शर्माला विराट कोहली फिरकी गोलंदाजी करु शकतो असं सुचवलं.
अजित आगरकर यांनी, "त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. त्याला फलंदाजीही जमते. कुलदीपनेही चांगली कामगिरी केली आहे. अशा दोन्ही गोलंदाजांना संधी देणं कठीण आहे. त्यामुळे आम्ही कुलदीपला निवडलं," असं सांगितलं. दोघांचा या मजेदार प्रतिक्रियांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Rohit Sharma: Hopefully Sharma and Kohli will also bowl in the WC . #RohitSharma #ViratKohli #AsiaCup pic.twitter.com/ej65iF65xK
— Md Nayab 786 (@mdNayabsk45) August 21, 2023
Rohit Sharma and press conference.
Show me a better love story than this pic.twitter.com/0MbTuFef58 #AsiaCup2023— (@LoyleRohitFan45) August 21, 2023
आशिया चषकासाठीच्या संघामध्ये डावखुला फलंदाज तिलक वर्माला संधी देण्यात आल्याने तिलक चौथ्या क्रमांकावर खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र रोहितने संघात कोणत्याही खेळाडूचा फलंदाजीचा क्रमांक ठरलेला नाही असं स्पष्ट केलं आहे. "मी या क्रमांकावर चांगला खेळतो असं संघात कोणीही म्हणता कामा नये. आमच्या गरजेप्रमाणे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकणारे खेळाडू आम्हाला हवे आहेत. हे आताच नाही मागील अनेक वर्षांपासून हे धोरण असेच आहे. आम्ही आमची ही मागणी खेळाडूंना पूर्वीच कळवली आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट असून क्लब क्रिकेट नाही याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. संघाच्या गरजेप्रमाणे त्यांनी आवश्यकतेनुसार खेळलं पाहिजे," असं रोहित शर्मा म्हणाला. "एका ठराविक क्रमांकावर ठराविक खेळाडू खेळतो असं करुन आम्हाला स्वत:ला बंधनं घालून घ्यायची नाहीत. सर्वांनी उत्तम कामगिरी करावी असं आम्हाला वाटतं. मात्र कोणाच्याही फलंदाजीचा क्रमांक निश्चित करण्यात आलेला नाही. हे खेळाडूंनाही सांगण्यात आलं आहे," असं रोहितने सांगितलं.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
राखीव खेळाडू- संजू सॅमसन