Border Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा गोलंदाज ब्रॅण्डन ज्युलियनने भारतीय संघाबद्दल फारच स्फोटक विधान केलं आहे. पर्थ येथे होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी आधीच ज्युलियनने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ भारतीय संघाला चार दिवसात पराभूत करेल असं भाकित व्यक्त केलं आहे. ज्युलियनने 1993 ते 1992 दरम्यान ऑस्ट्रेलियन संघासाठी 7 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतीय संघासमोर अनेक आव्हानं असल्याचं ज्युलियनचं म्हणणं आहे. अनेक खेळाडू उपलब्ध नसल्याने पहिला सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल असं ज्युलियनचं म्हणणं आहे. इतकेच नाही तर भारतीय संघामध्ये मतभेद असल्याचं मतही या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केलं आहे. 


भारतासमोर आव्हानांचा डोंगर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ पहिल्या कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. यामुळेच भारतीय संघाची चिंता वाढमार असल्याचं ज्युलियननं म्हटलं आहे. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहम्मद शमी पहिला सामना खेळणार नसल्याचं उघड आहे. सध्या शमी रणजी चषक खेळत आहे. त्यामुळे हा सुद्धा भारतासाठी चिंतेचा विषय असणार असं ज्युलियनचं म्हणणं आहे. तसेच ज्युलियनने एक मोठा दावा करताना सध्या चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधाराबरोबर मतभेद असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. विराटला प्रशिक्षक आणि कर्णधाराबरोबर जुळवून घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याची शंका ज्युलियनने उपस्थित केली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला आव्हान देणारच नाही असं नाही. मात्र सध्याची भारतासमोरील आव्हानं पाहता पहिल्या कसोटीनंतर मालिकेचा स्कोअरबोर्ड 1-0 असा असू शकतो असं ज्युलियनचं म्हणणं आहे.


चार दिवसात भारताचा पराभव?


"ऑस्ट्रेलियन संघ भारताला चार दिवसात पराभूत करेल. भारतासाठी अनेक चिंतेच्या गोष्टी सध्या दिसत आहेत. रोहित शर्मा पहिला सामना खेळत नाहीये. तो कधी संघात असतो कधी नसतो अशी स्थिती आहे. तसेच यामुळे जसप्रीत बुमराह कर्णधार असणार आहे. त्यामुळे जेव्हा सलामीला गोलंदाजी करणाराच कर्णधार असतो तेव्हा त्याच्यावर फार तणाव असतो. तो फार उत्तम गोलंदाज आहे यात शंका नाही. मात्र तुम्ही सलामीला गोलंदाजी करत असाल आणि तुमच्याकडे कर्णधार पद असेल तर फार तणाव येतो," असं ज्युलियनने 'फॉक्स न्यूज'बरोबर बोलताना सांगितलं आहे. 


विराट एकटा पडला?


"ज्या पद्धतीने विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध बाद झाला ते पाहता त्या कसोटी मालिकेच्या आठवणींमधून बाहेर निघणं त्याच्यासाठी कठीण असेल. विराट त्याचा सर्वोत्तम खेळ करत नाहीयेत. कदाचित त्याचं आणि कर्णधाराचं पटत नसेल. त्याचं प्रशिक्षकाबरोबरही पटत नसावं. मात्र तो अत्यंत वेगाने ही परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य बाळगतो," असं ज्युलियनने म्हटलं आहे. यामधून ज्युलियनने विराट कोहली कर्णधार आणि गौतम गंभीरसमोर एकटा पडला आहे की काय अशी शंका व्यक्त केली आहे.