Suryakumar Yadav On India Vs Australia T-20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आजपासून 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरु होत आहे. 19 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात कच खाल्ली आणि भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. या सामन्याला 4 दिवस होत नाही तोच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होत असल्याने काही माजी खेळाडूंनी एवढ्या घाईने मालिके घेण्यावरुन नाराजी बोलून दाखवली आहे. मात्र या मालिकेमध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली यासारखे मोठे खेळाडू खेळणार नाहीत. त्यामुळेच या मालिकेमध्ये संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं आहे. सूर्यकुमार यादवने स्पर्धा सुरु होण्याच्या एकदिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघाला कर्णधार म्हणून आपण एकच गोष्ट सांगितली आहे असं म्हणत ती एक गोष्ट कोणती याबद्दलचा खुलासा केला आहे.


सर्व गोष्टी करण्याची मूभा ज्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज होणारा सामना विशाखापट्टणममधील डॉ. व्हाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. वर्ल्ड कपच्या दीड महिन्यांच्या स्पर्धेनंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. टी-20 मधील अव्वल खेळाडू असलेल्या सूर्यकुमारकडे याच कारणामुळे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सूर्यकुमार यादवने संघाबरोबर झालेल्या चर्चेबद्दलचा खुलासा केला. "टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता आम्ही जी मालिका खेळत आहोत ती फार महत्त्वाची आहे. मी सर्वांना न घाबरता खेळण्यास सांगितलं आहे. संघाला फायदा होईल त्या सर्व गोष्टी करण्याची मूभा खेळाडूंना देण्यात आली आहे," असं सूर्यकुमार म्हणाला आहे.


नक्की वाचा >> 'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला


एकच गोष्ट सांगितली की...


भारताचा मुख्य संघ वर्ल्ड कप खेळत असताना भारतातील घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारे अनेक नवीन चेहरे सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील संघात आहेत. यासंदर्भात बोलताना सूर्यकुमारने, "सर्वांनीच आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली असून घरगुती क्रिकेटमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. सर्वजण उत्तम कामगिरी करत आहेत, असं मी सपोर्टींग स्टाफकडून ऐकलं आहे. मी त्यांना केवळ एकच गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे मैदानात गेल्यानंतर खेळाचा आनंद घ्या. काही वेगळं करण्याची गरज नाही. कारण काहीही झालं तर शेवटी हा एक क्रिकेटचा सामनाच आहे," असं सांगितलं.



ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अशी आहे भारतीय टीम-


सूर्यकुमार यादव (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार