नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली आहे. पहिल्याच दिवसापासून क्रिकेटच्या या मेळ्यात विविध संघांतील खेळाडूंची अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली आणि चेन्नई या संघांमधील सामन्यात दक्षिणेच्या डॅशिंग खेळाडूंनी अर्थान महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईच्या संघाने यजमान दिल्लीला नमवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात धोनी मैदानात त्याची किमया दाखवत होता, तर प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची एक चाहतीसुद्धा सर्वांचं लक्ष वेधत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीची ही चाहती म्हणजे त्याची लाडकी लेक झिवा. चेन्नई संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुन झिवाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ती मोठ्या उत्साहात 'पापाssssssss, कम ऑन पापा....', असं ओरडताना दिसत आहे. आपले वडील काहीतरी अफलातून काम करत आहेत, मग त्यांना प्रोत्साहित का बरं करु नये?, असेच भाव झिवाच्या निरागस चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत.




आयपीएलच्याही ट्विटर अकाऊंटवरुन झिवाचा असाच आणखी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती अतिशय उत्साहात माहिला, पापाsssss म्हणून हाक मारताना दिसत आहे. चाहत्यांच्या प्रेमाच्या बळावर धोनीने नेहमीच क्रिकेटच्या मैदानात चांगली कामगिरी केली आहे. पण, त्याच्या मुलीकडून मिळणारं हे आगळंवेगळं आणि तितकंच उत्साही प्रोत्साहन त्याच्यासाठी सर्वतोपरी खास असणार हे खरं. मुख्य म्हणजे धोनीच्या लेकीचा हा अंदाज सध्या नेटकऱ्यांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाला असून, त्यांच्यातही तिचीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या धोनीची लेक झिवाही बाबांच्या लोकप्रियतेला टक्कर देणार असं म्हणायला हरकत नाही.