भारत-पाकिस्तान सीरिजबाबत धोनीची प्रतिक्रिया
देशातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट फॅन्सना भारत-पाकिस्तान सीरिजची नेहमीच उत्सुकता असते.
कुंजेर : देशातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट फॅन्सना भारत-पाकिस्तान सीरिजची नेहमीच उत्सुकता असते. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आयसीसी टुर्नामेंटमध्ये झालेल्या मॅचशिवाय एकही मॅच झालेली नाही.
याआधी पाकिस्ताननं २०१२-१३मध्ये भारताचा दौरा केला होता. दोन टी-20 आणि तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये पाकिस्ताननं वनडे सीरिज जिंकली तर टी-20 सीरिज बरोबरीत सुटली. त्यानंतर अजूनही भारत-पाकिस्तानमध्ये सीरिज झालेली नाही.
२०१४मध्ये बीसीसीआयनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत करार केला होता. २०१५ ते २०२३पर्यंत भारत पाकिस्तान सहा सीरिज खेळेल, असं या करारात नमुद करण्यात आलं होतं. पण भारत-पाकिस्तानमधल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये अजून एकही सीरिज होऊ शकली नाही.
धोनीची प्रतिक्रिया
भारत-पाकिस्तानमधल्या क्रिकेटबाबत आता महेंद्रसिंग धोनीनं प्रतिक्रिया दिली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये होणारी सीरिज ही फक्त खेळ नाही, त्यापेक्षा अधिक आहे. या सीरिजबाबत सरकारनंच निर्णय घ्यायला पाहिजे, असं धोनी म्हणाला आहे.
महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपटूसोबतच लेफ्टनंट कर्नलचीही भूमिका बजावत आहे. काश्मीर दौऱ्यावर असलेला धोनी रविवारी बारामुलाच्या कंजूरमध्ये लष्कराकडून आयोजित करण्यात आलेल्या मॅचसाठी आला होता. यावेळी त्यानं स्थानिक नागरिक आणि खेळाडूंशीही बातचित केली.
धोनीनं डिसेंबर २०१४मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनी सध्या टी-20 आणि वनडे क्रिकेट खेळत आहे. भारत सध्या श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सीरिज खेळत आहे, त्यामुळे धोनी टीममध्ये नाही. पुढच्या महिन्यात १० डिसेंबरपासून श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. या मॅचपासून धोनी पुन्हा भारतीय क्रिकेट टीममध्ये असेल.