टीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर `हा` स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) फायनलचं तिकीट मिळेल. मात्र यापूर्वी टीम इंडियाला दुखापतीच ग्रहण लागलं आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संपूर्ण टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाला रवाना झाली असून येथे टीम इंडियाचे खेळाडू पर्थ येथे होणाऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी WACA मैदानावर वॉर्म अप सामने खेळत आहेत. शुक्रवारी भारताचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज केएल राहुल याला दुखापत झाल्याची बातमी आली होती. पर्थमध्ये WACA मैदानावर भारत आणि भारत-A यांच्यात तीन दिवसीय वार्मअप सामना खेळवला जात आहे. यावेळी खेळताना एक बॉल बाउंस होऊन राहुलच्या उजव्या एल्बोवर जाऊन लागला. बॉल लागल्यावर राहुल वेदनेने कळवळला. वेदनेमुळे राहुल फलंदाजी सुरु ठेऊ शकला नाही ज्यामुळे तो मैदान सोडून बाहेर पडला. आता राहुलनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलला देखील दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : दुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
शुभमन गिल हा भारताचा स्टार फलंदाज असून तो टेस्टमध्ये अधिकतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. WACA मैदानावरील वॉर्म अप सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमनला कॅच पकडताना अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. गिलची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. राहुल पाठोपाठ गिलला सुद्धा दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
रोहित शर्मा पर्थ टेस्टसाठी हजर राहणार?
टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही गरोदर असल्याने ती नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार होती. तेव्हा कुटुंबाला वेळ देण्याकरता रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला टेस्ट सामना खेळणार नव्हता. त्यामुळे तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला सुद्धा गेला नाही. मात्र आता 15 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा रोहित शर्माची पत्नी रितिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे आता रोहित काही दिवसात ऑस्ट्रेलियाला रवाना होऊन पहिला टेस्ट सामना खेळू शकतो असे म्हटले जात आहे.