मुंबई : सिम कार्ड (Sim Card) घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आहे. अनेकदा काही जण आधार कार्डचा गैरवापर करत दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेतात. त्या सिम कार्डचा गैरवापर केला जातो. त्याचा मनस्ताप हा आधार कार्डधारकाला भोगावा लागतो. मात्र तुमच्या आधार कार्डावर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे अवघ्या एका क्लिकवर जाणून घेता येणार आहे. एका व्यक्तीच्या आधारवर तसेच इतर कागदपत्रांवर किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecom) नवं पोर्टल सुरु केलं आहे. (know how many numbers linked with your aadhar card) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी आहे प्रोसेस.........


आपल्या आधारसह किती मोबाईल नंबर लिंक आहेत, हे जाणून घेण्यासाठी http://tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईल नंबर एंटर करावा. त्यानंतर मोबाईलवर एक 6 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी एंटर केल्यानंतर तुमच्या आधारवर खरेदी करण्यात आलेले मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. सध्या ही सुविधा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठीच आहे. मात्र या सुविधेचा लाभ सर्वचं घेऊ शकतात, असं या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.   


आधार कार्डाचा गैरवापर करुन सिम कार्ड घेतले जातात. त्याद्वारे लोकांची फसवणूक केली जाते. मोबाईल युझर्ससह अशा कोणत्याही प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागू नये तसेच कोणतीही फसवणूक होऊ नये, या उद्देशाने दूरसंचार विभागाने हे नवं पोर्टल सुरु केलंय.  


दूरसंचार विभागाने काय म्हटलंय? 


"ही वेबसाईट युझर्सच्या मदतीसाठी विकसित करण्यात आली आहे. या पोर्टलच्या मदतीने युझर्स त्याच्या नावे किती मोबाईल कनेक्शन सुरु आहेत, हे जाणून घेता येऊ शकतं. तसेच कोणतं एखादं जास्तीचं कनेक्शन असेल, तर ते रेग्युलरही करता येऊ शकतं. एखाद्या व्यक्तीच्या नावावर 9 पेक्षा अधिक मोबाईल सिम कार्ड असतील, तर त्या व्यक्तीला एसएमएसद्वारे माहिती दिली जाते", असं दूरसंचार विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय. तुमच्या नकळत जर अधिक मोबाईल सिम घेतले गेले असतील, तर त्याबाबतची तक्रारही या वेबसाईटद्वारे करता येते.