Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 20 मतदारसंघांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. पुण्याचे माजी महापौर तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून बुधवारी सायंकाळी मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये तिकीट मिळाल्याचा जल्लोषही कार्यकर्त्यांनी साजरा केला. 


विशेष शुभेच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी मोहोळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असतानाच मोहोळ यांचे मित्र तसेच मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनीही मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. फेसुकवर मोहोळ यांच्याबरोबर फोटो शेअर करत तरडेंनी शुभेच्छा दिल्यात. 'मित्रवर्य मुरलीधर खूप शुभेच्छा' या मथळ्याखाली प्रवीण तरडेंनी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.


पुढील 25 वर्षांसाठी खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती


"सांस्कृतिक पुण्याला सुसंस्कृत खासदार मिळावा ही प्रत्येक पुणेकराची ईच्छा पुर्ण होण्याच्या दृष्टीने आज पहिलं पाऊल पडलं. मुरलीधर मोहोळ प्रत्येक पुणेकराची पहिली पसंती असेल यात शंका नाही. कारण पुण्याचा महापौर असताना आमच्या या मित्रानं कोरोना काळात कुटुंब जपावं तसं अख्खं पुणे शहर जपलं. त्यामुळे आता देशासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पुणेकर त्याला विक्रमी मताधिक्क्याने मोदींचा शिलेदार म्हणून दिल्लीला पाठवतील," असा विश्वास तरडेंनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. "रांगड्या मातीतला हा देखणा मुरलीधर त्याच्या आक्रमक कामाबरोबरच लाघवी स्वभावासाठी सुध्दा प्रसिध्द आहे. त्याचं वय पहाता पुढची 25 वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला असेच वाटतेय," असं तरडेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. मुरलीधर मोहोळ सध्या 50 वर्षांचे असून ते वयाच्य 75 व्या वर्षापर्यंत तरी खासदार राहतील असा विश्वास तरडेंनी व्यक्त केला आहे.


नक्की वाचा >> राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'



अनेकांची नावं होती चर्चेत


लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाबरोबरच माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर यांची नावेदेखील उमेदवारीसाठी चर्चेत होती. माजी खासदार संजय काकडेदेखील पुण्यातून उमेदवारी मिळावण्यासाठी प्रयत्नशील होते. असं असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी मोहोळ यांना पक्षाने संधी दिली आहे.


नक्की वाचा >> शिंदेंच्या मुलाला पाडणार? अजित पवार गटाकडून 'टप्प्यात कार्यक्रम'? म्हणाले, 'कोणाला वाटत असेल..'


आता मुरलीधर मोहोळ या संधीचं सोनं करतात का हे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. मात्र उमेदवारी मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय हे मात्र खरं.