राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'

Vasant More On Sanjay Raut: वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षानंतर सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सूचक विधान केलेलं

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 13, 2024, 02:15 PM IST
राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...' title=
संजय राऊतांनी नोंदवलेली प्रतिक्रिया

Vasant More On Sanjay Raut: राज ठाकरेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील पुण्याचे डॅशिंग नेते वसंत मोरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वसंत मोरे यांनीच यासंदर्भातील घोषणा मंगळवारी केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंनी घेतलेला हा निर्णय मनसेचा मोठा धक्का मानला जात आहे. वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याशी अनेक पक्षांनी संपर्क साधला असून पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचं सांगितलं जात आहे. अशातच मोरेंनी उद्धव ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी नोंदवलेल्या 'वॉशिंग मशिन'चा उल्लेख असलेल्या प्रतिक्रियेवर आपलं मत मांडलं आहे.

राऊत काय म्हणाले होते?

वसंत मोरेंनी मंगळवारी (12 मार्च 2024 रोजी) मनसे सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. संजय राऊत यांना पत्रकारांनी वसंत मोरेंच्या निर्णयासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "आता वसंत मोरेंनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावर मी काय मत व्यक्त करणार? त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी रामराम का ठोकला? त्यांची पुढली दिशा काय आहे? ते लोकसभा लढणार तर कोणाकडून लढणार?" असं म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी 'वॉशिंग मशिन'चा उल्लेख करत मोरेंनी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होऊ नये असं सूचक विधान केलं. "फक्त त्यांनी वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वत: स्वच्छ आहेत. त्यामुळे चांगला कार्यकर्ता आहे. मी त्यांना ओळखतो. जसे पुण्यात रविंद्र धनगेकर आहेत तसेच वसंत मोरे आहेत," असं राऊत म्हणाले.

वसंत मोरे 'वॉशिंग मशिन' प्रतिक्रियेसंदर्भात काय म्हणाले?

"संजय राऊत यांचा मला काल रात्री फोन आला होता. त्यांनाही मी असं सांगितलं की मला दोन दिवस द्या. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन," असं वसंत मोरे संजय राऊतांनी संपर्क साधल्याचासंदर्भ देत म्हणाले.  "काल सुद्धा त्यांची प्रतिक्रिया ऐकली की तात्यांनी वॉशिंग मशिनकडे जाऊ नये. एवढ्या मोठ्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल प्रतिक्रिया देणं हे खरं तर माझं भाग्य समजेल," असं संजय राऊतांच्या प्रतिक्रियेसंदर्भात बोलताना वसंत मोरेंनी सांगितलं.

नक्की वाचा >> राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा

धमकावलं जात आहे

पक्ष सोडल्यानंतर आपल्याबरोबर पक्षाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा आरोपही वसंत मोरेंनी केला आहे. "मला ज्या त्रासामुळे पक्ष सोडावा लागला त्यानंतरही लोक अजूनही शहाणी होत नाहीत. माझ्याबरोबर पक्ष सोडणाऱ्या कार्यकर्त्यांना रात्री अपरात्री फोन करुन धमकावलं जात आहे. या सगळ्या गोष्टीतून स्थिर होण्यासाठी 2 दिवस लागतील. त्यानंतर मी काय ते ठरवेन," असंही स्पष्ट केलं.