पुढील सुचना मिळेपर्यंत McDonald`s बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
Mcdonald`s Layoff: संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं संकट असताना या यादीत आणखी एका मोठ्या कंपनीच्या नावाचा समावेश होण्याची चिन्हं आहेत. ही कंपनी म्हणजे मॅकडॉनल्ड्स. कर्मचाऱ्यांना आलेल्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टी पाहता कर्मचारीही चिंतेत.
Mcdonald's Layoffs In America Temporarily Shuts Us Offices: जगभरात आर्थिक मंदीची (Recession) चाहूल लागलेली असतानाच मोठमोठ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येत आहे. असं असतानाच आता या यादीत दर दिवशी नव्यानं काही कंपन्यांच्या नावांचा समावेश होताना दिसत आहे. या कंपन्यांमध्ये जगातील सर्वात मोठी Fast Food Chain अशी ओळख असणाऱ्या Mcdonald's चाही समावेश होणार आहे. कारण, या आठवड्यापासून Mcdonald's त्यांची अमेरिकेतील कार्यालयं पुढील सुचना मिळेपर्यंत बंद करणार आहे.
कंपनीचं चाललंय काय?
'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या माहितीनुसार येत्या काळात कंपनीकडून कॉर्पोरेट विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जाऊ शकते, त्यांना यासंबंधीच्या सूचना देण्याच्या विचारात कंपनी असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सोमवार ते बुधवार यादरम्यान घरूनच काम करण्यासंबंधीचा Email करण्यात आला होता.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीसंदर्भातील माहिती व्हर्चुअली देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही Mcdonald's मधून नेमके किती कर्मचारी त्यांची नोकरी गमावणार हा आकडा मात्र अद्यापही समोर आलेला नाही. शिवाय एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्याचे निर्देशही कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
2023 च्या सुरुवातीलाच दिली होती कर्मचारी कपातीची कल्पना...
व्यवसायातील काही अद्ययावत आणि प्रगत तत्त्वांवर आधारित रणनितीची अंमलबजावणी करत असताना कंपनीकडून कॉर्पेरेट विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार असल्याचं म्हणत काही विभागांत कर्मचारी कपात केली जाऊ शकते, तर काही विभागांमध्ये नव्यानं नोकरभरती होऊ शकते याची कल्पना मॅकडॉनल्ड्सकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. सदरील घोषणा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील बुधवारपर्यंत होऊ शकते असं म्हटलं जात आहे.
हेसुद्धा वाचा : Space Romance: अंतराळात करा रोमान्स आणि सेक्स; स्पेस रॉकेटचे बुकींग सुरु
नोकरकपातीचं संकट टळेना...
दरम्यान, फक्त मॅकडॉनल्ड्सच या निर्णयावर पोहोचलं आहे असं नाही. तर, याआधी आर्थिक मंदी आणि वाढत्या महागाईचा आलेख पाहता परिस्थितीला तोंड देण्यासाठी Google, Amazon, आणि Facebook यांसारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला.
भारतीयांवर कितपत परिणाम?
परदेशात आयटी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केलेली असतानाच याचे थेट परिणाम भारतीय नोकरदार वर्गावरही होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी भारतातून मोठ्या संख्येनं कर्मचारी कामावर रुजू आहेत. पण, त्यातून अनेकांनीच गेल्या काही महिन्यांमध्ये नोकऱ्या गमावल्या आहेत. परदेशात असणाऱ्या काही भारतीयांचा व्हिसा संपण्याच्या मार्गावर आहे. नियमांनुसार H-1B व्हिसा धारक जेव्हा बेरोजगार होतात तेव्हा अमेरिकेतील नियमांनुसार ते पुढील 60 दिवसच इथं राहू शकतात. त्यामुळं अडचणींमध्ये या एका अटीचीही भर पडताना दिसत आहे.