मशहूँर मेरे इश्क की कहाँनी हो गई....

एका चाहतीच्या नजरेतून दीपिका-रणवीरसाठीचं हे पत्र...

Updated: Nov 16, 2018, 11:02 AM IST
मशहूँर मेरे इश्क की कहाँनी हो गई.... title=

सायली पाटील, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : ‘किसकी तलवार पर सर रखू ये बता दो मुझे... अगर इश्क करना खता है तो सजा दो मुझे....’ असं म्हणणारी मस्तानी रुपातील दीपिका जेव्हा जेव्हा डोळ्यांसमोर येते तेव्हा प्रत्येक वेळी प्रेमाची व्याख्या तितक्याच निर्भिडपणे आपल्याला सांगून जाते. तिच्या डोळ्यांमध्ये असणारा आत्मविश्वास आणि चमक ही फक्त रुपेरी पडद्यापुरताच सिमीत नव्हती हे नाकारता येणार नाही.

‘राम-लीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमधून दीपिका ज्या अभिनेत्यासोबत झळकली त्याच्यासोबतचं तिचं नातं आज साऱ्या विश्वासमोर एक पायंडा पाडणारं ठरलं आहे. रणवीर सिंग आणि दीपिका यांचं लग्न होताच किंबहुना त्याआधीपासूनच अबालवृद्धांपासून (ज्यांनी यांचे चित्रपट पाहिले आहेत) सर्वांनाच या जोडीमध्ये एक वेगळीच चमक दिसली. माझ्यासारख्या एका चाहतीसाठी ही जोडी फक्त कलाकार म्हणून नव्हे तर एक आदर्श वगैरे म्हणून जरा जास्त जवळची होती, आहे आणि यापुढेही राहील.

‘राम-लीला’मधून मी पहिल्यांदाच या दोघांना एकत्र पाहिलं. ‘राम रजाडी’ म्हणून रणवीर या चित्रपटात जितका प्रभावी ठरला तितकीच दीपिकाने साकारलेली ‘लीला’ ही त्यांच्या प्रेमाचा पाया तेव्हापासूनच भक्कम करत होती.  असं म्हणतात त्या चित्रपटापासूनच त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. कोणत्याही गोष्टीची चाहूल ज्यावेळी लागते तेव्हा त्याचे परिणाम हे नकळतच आपल्या वागण्याबोलण्यात दिसून येतात. कितीही नाकारलं किंवा सावरुन वागण्याचा प्रयत्न केला तरीही ज्या गोष्टी सर्वांसमोर यायच्या असतात त्या येतातच.

हे मी एक चाहती म्हणून सांगतेय तेसुद्धा अनुभवातूनच. माझ्या नजरेतून या जोडीच्या बाबतीतही तसंच झालं. ‘राम-लीला’च्या प्रेमाचा खळखळणारा प्रवाह मनात घर करत नाही तोच पुन्हा एकदा ‘बाजीराव-मस्तानी’च्या रुपात पुन्हा एकदा ही जोडी आपल्यासमोर आली. हा चित्रपट, त्यातील संवाद, भव्यता हे सारंकाही प्रशंसनीय, दाद देण्याजोगं.

चित्रपटाच्या यशाचं श्रेय दिग्दर्शकाला जात असलं तरीही त्याला जोड मिळाली ती म्हणजे दीपिका-रणवीरच्या खऱ्याखुऱ्या प्रेमाची. ज्यावेळी ‘मस्तानी’ पहिल्यांदाच बाजीरावांच्या समोर येते तेव्हा बाजीरावांच्याच लाथेने खाली पडल्यामुळे सावरुन उठणारी मस्तानीची भेदक नजर आणि तिचं सौंदर्य प्रेक्षक म्हणून मलाच घायाळ करुन गेलं. तर, त्यावेळी समोर उभ्या असणाऱ्या बाजीरावरुपी रणवीरची काय अवस्था झाली असेल.... हे काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. ‘बाजीराव-मस्तानी’मधील प्रत्येक दृश्यातून एक शिकवण मिळत होती. अखेरच्या क्षणी जेव्हा ‘हमारे दिल एकसाथ धडकते है मस्तानी...’ असं म्हणणाऱ्या बाजीरावांना उत्तर देत ‘...और एकसाथ रुकते भी है’ असं म्हणत ज्या आर्त भावनेने मिठीत घेते तेव्हा आपल्याही डोळ्यांतून पाणी येतं.

हे दृश्य साकारते वेळी खरंच आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला कायमचं गमावतोय हे दु:ख आणि त्याच व्यक्तीसोबत या जगाचा निरोप घेतोय ही शेवटची तरीही तितकीच सुखद भावना काय असते हे दीपिका आणि रणवीरच्या अभिनयावरुन पाहायला मिळालं. त्यावेळी खरंच प्रेमाची ताकद एखाद्या निर्जीव वस्तूतही जीव ओतून जाते, आपण तर चालतीबोलती माणसं आहोत... असं उगाचच वाटू लागतं.

‘इश्क, मोहोब्बत हमारे बस की बात नही’, असं मोठ्या आत्मविश्वासाने म्हणणाऱ्यांनाही दीपिका-रणवीरच्या प्रेमाने वेगळी शिकवण दिली.

नजरेतून व्यक्त होणारं प्रेम, समाजाच्या विरोधात जाऊन केलेलं प्रेम, बऱ्याच गोष्टी शिकवून जाणारं आणि आदर्श प्रस्थापित करणारं प्रेम आणि नि:स्वार्थपणे केलेलं प्रेम याचीच प्रचिती ‘दीप-वीर’च्या चित्रपटांमधून, त्यांची एकत्र उपस्थिती असणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामधून पाहायला मिळालं.

मी जितकं पाहिलं, वाचलं, ऐकलं त्यानुसार जवळपास सहा वर्षांच्या त्यांच्या या प्रवासात अडचणी आल्याच नाही असंही नाही. पण, तरीही एकमेकांची साथ असल्यामुळे या अडचणीची गडद छटा इतक्या सहजतेनं फिकी पडली की जणूकाही त्यांच्या प्रेमळ प्रवासाच्या चित्रात या छटेची गरजच होती असंच वाटू लागलं.

आज, दीपिका आणि रणवीर ज्यावेळी विवाहबद्ध झाले तेव्हा, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. माझ्या डोळ्यांतून मात्र आसवं घरंगळली. अर्थात ते आनंदाश्रूच होते. त्या दोघांचे फोटो पाहताना खरंच प्रेम, विश्वास आणि कोणत्याही गोष्टीसाठी दिला जाणारा वेळ कशा प्रकारे सारंकाही बदलून जातो याचीच जाणिव होत होती. त्यामुळे खरंच ही जोडी अशीच कायम राहो, आनंदात राहो आणि त्यांच्या प्रेमाला कोणाचीही दृष्ट न लागो याचीच कामना करताना म्हणावंसं वाटतंय.... मशहूँर ‘तेरे’ इश्क की कहाँनी हो गई....