ज्यावेळी सिनेमात स्त्री-पात्रासाठी अभिनेत्री मिळत नव्हती...

राजा हरिश्चंद्र यांच्या निर्मितीच्या कहाणीवर बनलेला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यावर आहे. 

Updated: Apr 30, 2018, 11:19 PM IST
ज्यावेळी सिनेमात स्त्री-पात्रासाठी अभिनेत्री मिळत नव्हती... title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : भारतीय सिनेमाचे पितामह दादासाहेब फाळकेंच्या जयंतीनिमिताने हा लेख देत आहोत, खरं तर हा सिनेमा दादासाहेब फाळके यांनी जो पहिला सिनेमा काढला, राजा हरिश्चंद्र यांच्या निर्मितीच्या कहाणीवर बनलेला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यावर आहे. मात्र यात दादासाहेब फाळके यांचा संघर्ष समोर येतो. ज्या देशात सिनेमा म्हणजे काय हे लोकांना माहित नव्हतं अशा काळात सिनेमा काढायचा म्हणजे लोकांच्या मते तो वेडेपणा. हा वेडेपणा करायला लागणारा पैसाही हातात नव्हता. पैशांसाठी घरातली एक वस्तू जरी विकली तरी कुटुंबातलं कुणी तरी वारलंय, असं सांत्वन गिरगावात व्हायचं. सिनेमात स्त्री पात्र करायला कुणी मिळत नव्हतं. सेक्सवर्कर्सच्या वस्तीतल्या बाईलाही सिनेमात काम करू द्यायला कुणी तयार नव्हतं. पुरूषाला स्त्री पात्राचं काम करायला सांगितलं, तरी बाप मेल्याशिवाय मिश्या काढायच्या नसतात, असा समज असलेला तो काळ होता.

सिनेमा कसा तयार करायचा हे जरी त्या काळी लक्षात घ्यायचं ठरवलं तरी डोक्याच्यावरून बारा हजार फुटांवर विमान उडण्यासारखं होतं. त्यासाठी इंग्लंडला जाऊन सिनेमाचं तंत्रज्ञान शिकायचं, कॅमेरा कसा करायचा हे सुद्धा.

आधुनिक सीसीडी तंत्रज्ञान असलेला कॅमेरा बाजारातून आणला रेकॉर्डिंगचं बटन दाबलं. जिलेबी तयार करताना हात फिरवतात तसा इकडे-तिकडे फिरवला, रेकॉर्ड झालं म्हणजे आला कॅमेरा असा तो काळ नव्हता. हाताने कॅमेऱ्याचा हॅण्डल फिरवून शूटिंग करावं लागत होतं. फिल्म एक्सपोझ करणं, मॅन्यूअल एडिटिंग करणं यात डोळ्याच्या खाचा पडायला व्हायच्या. तेव्हा कुठं चित्र हलली आणि पहिला हलत्या चित्रांचा सिनेमा तयार झाला.

बॉलिवूड नगरी मुंबईचा तो काळ होता. त्याकाळी गिरगावातले लोक दादरला जंगल आहे असं म्हणायचे. त्या दादरलाच सिनेमाची फॅक्टरी काढायचं ठरवलं. असल्या जंगलींना दादरचं जंगलच बरं असंही लोकांनी म्हणून टाकलं होतं.

कुठे कामाला जातायत? सिनेमात.. असं म्हटलं तरी सिनेमा म्हणजे काय? या प्रश्नाला उत्तर दिलं तरी वेडं लागलंय का? असा प्रश्न... मग सांगायचं... फॅक्टरीत कामाला जातोय. औद्योगिक क्रांतीमुळे फॅक्टरी शब्दही नुकताच लोकांना परिचयाचा झाला होता. सिनेमा शब्दही येत्या काळात परिचित होईल असं त्यांना सांगायला शहाण्यांकडून वेड्यांच्या यादीत बसवल्यासारखं होतं.

तरीही सिनेमा काढायला असंख्य अडचणी आल्या, हरिश्चंद्राच्या फॅक्टरीत सिनेमा काढताना अडचणींचा सामना दाखवला असला, तरीही सिनेमा तुम्हाला सतत हसवून खिळवून ठेवणारा आहे. सिनेमातील संगीतापासून प्रत्येक साकारलेली प्रत्येक भूमिका दादासाहेब फाळकेंच्या जीवनाच्या आणि पहिला सिनेमा काढण्यात घेतलेल्या परिश्रमाच्या जवळ घेऊन जाते.

अप्रतिम सिनेमा न टाळता येणारा असतो, त्याप्रमाणे तो सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पाहण्यासारखा असतो त्यातला हरिश्चंद्रांची फॅक्टरी हा एक सिनेमा.

भारतात सिनेमा फॅक्टरीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळकेंच्या जीवनावरील हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट ऑस्करमध्ये यश मिळवू शकला नाही. पण हा चित्रपट भारतातील संस्कृती, परंपरा आणि त्या त्या काळाची जाणीव असलेल्या माणसाला ऑस्करच्याही पलिकडचा सिनेमा वाटेल. फक्त हरिश्चंद्राची फॅक्टरीच नव्हे तर आशिया खंडातून ऑस्करसाठी जाणाऱ्या प्रत्येक सिनेमाच्या प्रेक्षकाला वाटतं. अवॉर्ड विनर चित्रपट, पुस्तक सगळेच वाचतात. पण वाचकाच्या, प्रेक्षकाच्या मनाला भावणारं, आवडणारं पुस्तक किंवा सिनेमा बरंच काही सांगून जातो.