''बाळा... देवाला आता एवढंच मागेन.... पुढच्या जन्मी मी तुझीच आई होईन हं''

फोटो कोरोना काळात सोशल मीडियावर हजारो-लाखो मिळतील. पण हा पोलीस या आजीसमोर फक्त ताट देऊन थांबला नाही.  थरथरत्या हातांनी आजीला खाता

जयवंत पाटील | Updated: Jun 1, 2021, 08:09 PM IST
 ''बाळा... देवाला आता एवढंच मागेन.... पुढच्या जन्मी मी तुझीच आई होईन हं'' title=

जयवंत पाटील, झी २४ तास, मुंबई : हा पोलीस आणि आजीचा फोटो कुठला आहे, माहिती नाही. पण एक पोलीस म्हाताऱ्या आजींना खायला जेवणाचं ताट घेऊन आला आहे. हातात अन्न, आणि कॅमेऱ्याकडे स्थिर नजर देतानाचे फोटो कोरोना काळात सोशल मीडियावर हजारो-लाखो मिळतील. पण हा पोलीस या आजीसमोर फक्त ताट देऊन थांबला नाही.  थरथरत्या हातांनी आजीला खाता येत नसावं, म्हणून अगदी आजीला लहान मुलांप्रमाणे आई बनून हा पोलीस खाऊ घालतोय. आजीच्या चेहऱ्यावरही असं समाधान आहे की, जणू आजी मनातल्या मनात म्हणत असावी, ''बाळा... देवाला आता एवढंच मागेन.... पुढच्या जन्मी मी तुझीच आई होईन'' 

आजीच्या हातावरच्या त्या नसा आणि लाखो सुरकत्या

तर हा पोलीसही मनातल्या मनात म्हणत असेल, ''माय, तुझ्या हातावर म्हातारपणामुळे जेवढ्या प्रकारच्या लहान-लहान नसा आणि हातावर लाखो सुरकुत्या दिसत आहेत. तेवढ्या प्रकारच्या दु:खाचा तू आयुष्याचा सामना केला असेल, अशा सर्व दु:खांचा आयुष्यात मला सामना करण्याची तू शक्ती दे.

घास खाऊ घालण्यासाठी ''आ-आ'' हा संवाद आई-मुलामध्येच

हा पोलीस या आजीला अन्नाचा घास खाऊ घालतोय, तो अगदी मनापासून, कारण आजीने ''आ'' करण्याआधी त्याचाही ''आ'' होत आहे. (फोटोत पाहा) असा ''आ'' एकाच वेळेस आई आणि लहान मुलाचा होतो, तो घास खावू घालताना, जेव्हा आई मुलाला म्हणते आ-आ. 

पण हे चित्र जरा बदललंय... येथे आई, ती देखील रक्ताचं नातं नसणारी... पण हा पोलिस त्या आजीची आई बनून तिला आपल्या लहान मुलाप्रमाणे घास खावू घालताना, आ-आ म्हणतोय...(फोटोत पाहा)

कोरोनासारख्या भीषण काळात, एका वयस्कर थरथरत्या हातपायांना पोलिसाकडून असा मायेचा आधार आणि पोटातल्या भूकेची आस मनापासून भागवणारा तिला साक्षात मुलगाच मिळाला आहे.

आईच्या पोटातल्या ऊबेत जन्म देण्याची शक्ती

आई तशी भूकेली नसते, कारण तसं पाहिलं तर आईच्या पोटातल्या ऊबेत प्रचंड शक्ती असते. तिच्या पोटात ऊब राहावी, ती भूकेली राहू नये, म्हणून काळजी घेणारे फार कमी झाले आहेत, हेच कोरोनानेही दाखवून दिलं आहे.

ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळात आणि कोरोनाआधी आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं, अशा सर्वांनी हा फोटो पाहा, एकदा तरी तुम्हाला या जन्मदात्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

पोटातली ही भूकेची ऊब तिला रात्ररात्र झोपू देत नसेल तर काय?

लहानपणी थंडीच्या दिवसात अंगावर पांघरुण घालणारी आई. उन्हाळ्यात ऊन लागू नये, म्हणून डोक्यावरच्या पदराच्या आडोशाने डोकं झाकणारी आई. ती जर उतार वयात ऊन, पाऊस, वारा, थंडी आणि सतत असुरक्षित वातावरणात राहत असेल, आणि पोटातली ही भूकेची ऊब तिला रात्ररात्र झोपू देत नसेल तर काय? म्हणून अशा लोकांच्या पोटाची ऊब व्हा...