वेळीच उपाययोजना केली नाही तर नाशिकची परिस्थिती गंभीर

नाशिक शहरात स्मार्ट पार्किंगच्या अंतर्गत पन्नासहून अधिक ठिकाणी पार्किंग यंत्रणा उभारण्यात आली मात्र ती अद्यापही सुरू केलेली नाही.

Updated: Jun 13, 2019, 07:17 PM IST
वेळीच उपाययोजना केली नाही तर नाशिकची परिस्थिती गंभीर  title=

किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : अलिकडे शहरांची झपाट्याने होणारी वाढ आणि अतिक्रमण यामुळे अनेक शहरात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहराबाबत तर न बोललेल बर, नाशिकमध्येही वाहतूक कोंडीची आणि पार्किंगची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे वेळीच नाशिकमध्ये वाहतूक विभाग आणि पालिकेने उपाययोजना केली नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांत लोकसंख्येमुळे वाहनांनाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यात शहरांचा विस्तार वाढत असतांना रस्ते मात्र त्याच लांबी रुंदीचे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंग सारख्या समस्या डोकं वर काढत आहेत. नाशिक शहरात काही परिस्थिति वेगळी नाही. नाशिकमध्येही हळहळू वाहूतुक कोंडीची समस्या घर करू लागली आहे. नाशिकमधील द्वारका सर्कल, रविवार कारंजा, ठक्कर बाजार आणि अशोक स्तंभ याठिकाणी तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. शहरातील 70 टक्के इमारतींना पार्किंगच नसल्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग केली जातेय. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागत आहे. त्यात स्मार्टरोडच्या कामामुळे आणखी वाहतूक कोंडी वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. 

नाशिक शहरात उभारण्यात आलेल्या बहुतांश इमारतींना पार्किंगची सुविधा नाही. काहींनी तर पार्किंगच्या जागेतच दुकाने थाटल्याने चालकांना रस्त्याच्या दुतर्फवर वाहन पार्क करावी लागताय. त्यातच पार्किंग झोन पुरेसे नसल्याने नो पार्किंग झोण मध्ये वाहन पार्क करावी लागतेय. त्यामुळे वाहतूक कोंडीला बेशिस्त पार्किंग जबाबदार असल्याची नाशिकमध्ये स्पष्टपणे समोर आले आहे. त्यासाठी पोलिसांकडून वाहने टोइंग करून दंडात्मक कारवाई केली जाते. तर स्मार्टरोडच्या कामामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणार्‍या त्रासामुळे स्मार्ट सिटीच्या अधियकार्‍यांना माफी मागण्याची वेळ आली आहे. 

नाशिक शहरात स्मार्ट पार्किंगच्या अंतर्गत पन्नासहून अधिक ठिकाणी पार्किंग यंत्रणा उभारण्यात आली मात्र ती अद्यापही सुरू केलेली नाही. त्यात त्रिस्तरीय पार्किंगची सेवा पुरवली जाणार आहे. त्यासाठी मोबाइल एप देखील निर्माण केल जाणार असून कॅशलेस सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंग दूर होईल असा पालिकेचा आणि पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. मात्र या सार्‍या घोषणा आणि मोहीम कागदावरच आहे. यावर अंमलबजावणी कधी होणार ? यावर पालिका आणि पोलिसांकडे कोणतही ठोस उत्तर नाही. त्यामुळे नाशिककरांची अजून तरी पार्किंग आणि वाहतूक कोंडीतून सुटका होणार नाही आहे.