‘आई’ रिटायर्ड होतेय....

अँगेला मर्केल यांचं टोपणनाव आहे ‘मुटी’... जर्मन भाषेत मुटी म्हणजे अर्थातच ‘आई’ तेदेखील इन्फॉर्मल. आपल्या सर्वोच्च नेत्याबद्दल जर्मनीची भावना

अमोल परांजपे | Updated: Feb 4, 2021, 04:56 PM IST
‘आई’ रिटायर्ड होतेय....  title=

अमोल परांजपे, झी मीडिया, मुंबई  : अँगेला मर्केल यांचं टोपणनाव आहे ‘मुटी’... जर्मन भाषेत मुटी म्हणजे अर्थातच ‘आई’ तेदेखील इन्फॉर्मल. आपल्या सर्वोच्च नेत्याबद्दल जर्मनीची भावना या शब्दातून व्यक्त होते. अर्थात, त्यांनी ही पदवी आपल्या मेहनतीनं, साधेपणानं, कुशल नेतृत्वानं कमावलीये. युरोपमधील कोणत्याही देशात सर्वाधिक काळ सलग एका देशाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे. 

2005 साली सर्वप्रथम त्या चँसेलर झाल्या, तेव्हा त्यांच्या कर्तृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण सलग 15 वर्ष जर्मनीचं सर्वोच्चपद सांभाळून त्यांनी टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.  2018 साली झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे अन्य छोट्या पक्षांची आघाडी करून मर्केल यांनी सत्ता टिकवली. मात्र त्याच वेळी आपल्या कारकिर्दीचा अस्त जवळ आल्याची जाणीव त्यांना झाली आणि पुढल्या टर्ममध्ये निवडणूक लढणार नाही, असं त्यांनी त्याच वेळी जाहीर करून टाकलं. 

विशेष म्हणजे, त्या हे आश्वासन पाळताना दिसतायत. मर्केल पक्षाच्या नेतृत्वपदावरून पायउतार झाल्यात. पण त्यांनी दाखवलेली वाट आणि घालून दिलेला आदर्श पुढल्या अनेक पिढ्यांना पुरणारा आहे, केवळ जर्मनीच्याच नव्हे, तर जगाच्या... 

मर्केल यांना खरंतर वैज्ञानिक किंवा रशियन शिक्षिका व्हायचं होतं. पहिल्या नोबले पुरस्कार विजेत्या महिला शास्त्रज्ञ मेरी क्युरी या त्यांच्या आदर्श... त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मर्केल यांनी क्वांटम केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये पदवी मिळवली. 

लीपझिश विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर जर्मन अकॅटडी ऑफ सायन्समधून पीएचडीदेखील केली. त्या उत्तम रशियन बोलतात. त्यांनी आपली पॅशन पूर्ण केली असती, तर त्या नक्कीच उत्तम शास्त्रज्ञ किंवा शिक्षिका झाल्या असत्या. जग मात्र एका सर्वोत्तम नेत्यापासून वंचित राहिलं असतं.  

युरोपातील सर्वात शक्तिशाली देशाच्या सर्वोच्च नेतेपदी सर्वाधिक काळ बसल्यानंतर आजही त्यांच्यातला साधेपणा तसुभरही कमी झालेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांचे राष्ट्रीयत्व आणि व्लादिमिर पुतीन यांच्यासारख्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या नेत्यांसमोर तर मर्केल यांचं साधेपण अधिक उठून दिसतं. 

तब्बल 15 वर्ष एका औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशाच्या नेतेपदी राहूनही त्यांनी कोणतीही प्रॉपर्टी, गाड्या-घोडे, यॉट वैगरे स्वतःसाठी घेतलेलं नाही. अनेकदा तुमच्या-आमच्यासारखे त्यांचे कपडेही ‘रिपिट’ होतात. त्यांच्या घरात नोकरांचा फौजफाटा नाही. त्यांना कुकिंगची आवड आहे. एकूणच, आपल्या घरातली प्रेमळ आई असावी, अशाच त्या सगळ्या देशाच्या आई आहेत.  

त्यांचं हे आईपण केवळ जर्मनीसाठी किंवा जर्मन नागरिकांसाठी नाही. वसुधैव कुटुंबकम् हे त्या मनापासून मानतात. त्यामुळेच 2015 साली निर्वासितांकडे बघून सगळा युरोप नाकं मुरडत असताना मर्केल यांनी जर्मनीच्या सीमा खुल्या केल्या. 

त्या केवळ निर्वासितांना आश्रय देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांना आपलंसं केलं. त्यांना जर्मन नागरिकत्व मिळावं, यासाठी त्या आजही इतर नेत्यांची मनधरणी करतायत. शिवाय युरोपियन समुदायातील इतर देशांनीही निर्वासितांसाठी आपलं मन मोठं करावं, यासाठी त्यांचा कसोशीनं प्रयत्न सुरू आहे.  

2005 साली पुरूषी मनोवृत्तीच्या विरोधकांची टीका झेलत त्या चँसेलर झाल्या. त्यानंतर तिसऱ्याच वर्षात त्यांना सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. 2008मधली जागतिक मंदी. मात्र कुशल नेतृत्व आणि प्रशासनाच्या जोरावर त्यांनी या मंदीच्या लाटेत जर्मनीची नौका बुडू दिली नाही. 

उलट युरोपातल्या आणि जगातल्या इतर अनेक अर्थव्यवस्थांनाही आधार दिला. त्या मंदीनं मर्केल यांच्या नेतृत्वाच्या सोन्याचा कस लागला आणि त्याला आणखी लख्ख झळाळी प्राप्त झाली. 

आता आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात त्यांना पुन्हा एकदा आजवरच्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतंय. कोविड पॅनडेमिकमुळे सगळ्या जगाला वेठीला धरलंय. अशा वेळी जर्मनी आणि युरोपची अर्थव्यवस्था हेलकावे खाऊ नये, यासाठी त्यांची धडपड सुरू आहेच, मात्र यावेळीही त्या आपली जागतिक भूमिका विसरलेल्या नाहीत. त्यामुळेच ‘विकसित अर्थव्यवस्थांनी स्वार्थीपणे विचार न करता विकसनशील देशांना मदतीचा हात दिला पाहिजे’, असं आवाहन करताना त्या दिसतायत.  

मर्केल यांची संपूर्ण कारकीर्द एखाद्या नायिकेसारखी राहिलीये. सलग 10 वर्ष फोर्ब्सच्या जगातील सर्वात ताकदवान महिलांच्या यादीत त्या सर्वोच्चस्थानी राहिल्यात. तर सर्वोत्तम व्यक्तिमत्वांच्या सर्वसमावेशक यादीत त्या 2 वेळा दुसऱ्या स्थानी राहिल्यात. या यादीमध्ये एखाद्या महिलेला मिळालेलं हे सर्वात मोठं स्थान आहे हे विशेष... 

एकेकाळी हिटलरसारख्या जहाल आणि टोकाचं राष्ट्रीयत्व असलेल्या नेत्यामुळे बदनाम झालेल्या जर्मनीला नवी ओळख मिळवून देण्याचं काम अँजेला मर्केल यांनी केलंय. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनच्या नेतेपदी आर्मिन लॅशेट यांची निवड झाल्यानंतर ‘जर्मनीची आई’ आता रिटायर्ड होणार, हे जवळजवळ निश्चित झालंय.  

पण आई कधीच खरोखर रिटायर्ड होत नसते. फक्त घरातली तिची भूमिका बदलते. मर्केल यांच्या बाबतीतही तसंच असेल. जर्मनीच्या सक्रीय राजकारणातून त्या निवृत्ती घेत असल्या तरी देशाला, युरोपला आणि जगाला त्यांचं मार्गदर्शन मिळतच राहील, याची खात्री आहे. अत्यंत खडतर काळात, जागतिक साथ आणि मंदीचं वादळ घोंघावत असताना मर्केल यांच्यासारख्या एका ‘दीपस्तंभा’ची गरज आहेच...