पत्नीच्या मृत्यूनंतर भूषण कडू घेणार होता आयुष्य संपवण्याचा निर्णय; 'त्या' एका घटनेनं आयुष्य बदललं

Bhushan Kadu : भूषण कडूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सगळ्या घटनेविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2024, 05:22 PM IST
पत्नीच्या मृत्यूनंतर भूषण कडू घेणार होता आयुष्य संपवण्याचा निर्णय; 'त्या' एका घटनेनं आयुष्य बदललं title=
(Photo Credit : Social Media)

Bhushan Kadu : 'बिग बॉस मराठी 1' फेम आणि अभिनेता भूषण कडूनं अनेक चित्रपट आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलं. पण कोरोना काळात त्याच्या पत्नीच्या निधनानंतर भूषणला काही कळतं नव्हतं. त्यानंतर त्याचा जणू एक कठीण काळ सुरु झाला होता. अशी वेळ आली होती की भूषणनं स्वत: ला संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यानं सुसाइड नोट देखील लिहायला घेतलं होतं. या सगळ्याविषयी भूषणनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

भूषणनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिली आहे. या मुलाखतीत भूषणनं लॉकडाउनमधल्या त्या घटनेविषयी सांगितले. भूषण म्हणाला, 'जेव्हा कादंबरी आजारी होती, तेव्हा रोज थोडा थोडा आर्थिक संजय संपत आला. एका वेळेनंतर तो संपला. त्यावेळी काही लोकांनी मला मदत केली. विजय पाटकर यांनी काही न सांगता मला एक रक्कम पाठवली. त्या काळात संपूर्ण इंडस्ट्री ही बंद पडली होती. प्रत्येकाच्याच आयुष्यात आर्थिक अडचणी होत्या. कसं बसं दिवस जात होते. नंतर ठरवलं की जर आता आर्थिक चणचण संपवायची असेल तर एकतर काम करणं फार गरजेचं आहे, पण हे मला खूप उशिरा कळलं. या सगळ्याला इतका कंटाळलो की ठरवलं स्वत: ला संपवायचं. कारण मुलाचं दु: ख पाहू शकत नाही. स्वत: च्या काळजाला खूप त्रास होतोय. आपण मुलाला काही देऊ शकत नाही आहे. बाप मोठा आहे कलाकार आहे, लोक येऊन फोटो काढतात. पण त्याला जे अपेक्षित आहे ते तो बोलून दाखवत नसेल. तो खूप सात्विक स्वभावाचा आहे. मग ठरवलं की हे सगळं बघण्यापेक्षा स्वत: ला संपवूया आणि या जगातूनच निघून जाऊया. सुसाइड नोट मी लिहायला घेतली आणि ती संपेच ना, कारण सगळंच त्यात मांडायचं होतं. त्यातून मुलालाही सांगायचं होतं की त्याचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे. बायकोचं किती महत्त्वाचं स्थान होतं. प्रेक्षकांबद्दलचा आदर. मित्रमंडळी, सुख: दु:ख सगळी मांडायची होती. मी रोज ती सुसाईड नोट लिहायला बसायचो. 10-15 पानं झाली ती काही संपेना.' 

हेही वाचा : सैफ-करीनाच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याच्या 'त्या' कृतीमुळे चाहते चिंतेत

आयुष्यातील टर्निंग पॉइंट

पुढे भूषण कडू त्याच्या टर्निंग पॉइंटबद्दल म्हणाला, 'एकदिवस घरातील काही सामान आणायला बाहेर आलेला होतो. त्यावेळी पावसाळा होता. खिशात जास्त पैसे नव्हते. दुकानात असलेल्या छत्रांकडे पाहून मी विचार करत होतो की छत्री घ्यायची की नाही. कुठे जायचं झालं तर भिजत जावं लागतं. मग मी दुकानदाराला छत्रीची किंमत विचारली. त्यानं 350 रुपये सांगितली. पण, तेवढे पैसे आज खर्च केले तर पुढे काय. पैसे जपून वापरायला हवे. मग विचार केला ज्या मानसाकडे खूप काही होतं तो आज छत्री घेताना विचार करतोय. मी त्याच्यासोबत भाव-ताव पण केला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी विचारात होतो आणि तितक्यात अचानक मागून पाठीवरती थाप आली, वळून पाहिलं तर तिथे चार-पाच माणसं होतं. ते म्हणाले भूषण कडू ना? मग मी हो म्हटलं. ते म्हणाले की चांगलं काम करता वगैरे तुम्ही ही काय अवस्था करुन घेतली आहे. मग मनात असं यायचं की उद्देषानं पोट भरणार नाही आहे. त्यामुळे जमल्यास काम द्या. त्या 4-5 लोकांपैकी एक व्यक्ती होती. ते स्वामी समर्थांच्या ठाण्यातील मठाचे मठाधिपती होते. मी ओळखत नव्हतो. ते म्हणाले असं वागू नका. चांगले कलाकार आहात. ते म्हणाले उद्या एक काम करा मठात या. मी त्यावेळी सुसाईड नोट तर लिहितंच होतो. मग म्हटलं बघू जाऊन तर बघू... काय फरक पडतोय. मग म्हटलं चला स्वामींनाच विचारू या. काय स्वामी तुम्हालातर एवढी लोकं मानतात. अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणतात, माझ्या बाबतीत असं कधी होणार. त्यानंतर त्या लोकांनी माझ्या डोक्यात चांगले विचार टाकण्याचे प्रयत्न केलं. त्यांनी मला पैशाची मदतही केली. रोज उठून अंघोळ करायची आणि मठात जायचं आणि संध्याकाळी घरी जायचं. हेच माझं रुटिन झालं होतं. त्यांनी मला सगळ्याप्रकारे मदत केली. मग हळूहळू माझं सुसाइड नोट लिहिणं कमी झालं. आर्थिक गरजेसाठी आणि या चांगल्या लोकांसाठी पुन्हा काम करायचं ठरवलं.'