पत्नीला सरप्राईज देण्यासाठी मराठमोळा अभिनेता झाला 'बेकर'

पाहा त्यानं तिच्यासाठी हा केक बनवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न केले....   

Updated: Jul 29, 2020, 10:32 AM IST
पत्नीला सरप्राईज देण्यासाठी मराठमोळा अभिनेता झाला 'बेकर' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सातत्यानं काही पोस्ट सोशल मीडियावर गर्दी करत होत्या. या पोस्ट होत्या प्रत्येकामध्येच दडलेल्या शेफला जाग आल्याच्या. अर्थात नवनवीन पदार्थ करत आपल्या पाककौशल्याची माहिती सर्वांनाच करुन देण्याकडे यादरम्यानच्या काळात अनेकांचा कल दिसला. यामध्ये सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे राहिली नाहीत. 

सहसा आपल्या मनोरंजनासाठी म्हणून एकाद्या कलेचा नमुना सादर करण्यात मग्न असणारे हे चेहरे या लॉकडाऊनच्या काळात स्वयंपाकघरात रुळलेले दिसले. यातीलच एक अभिनेता सध्या सोशल मीडियावर गाजतोय. तो, त्याच्या कलाकृतीमुळं नव्हे तर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या सुरेख अशा केकमुळं. 

उत्तम केक बनवणं हे मोठं जिकिरीचं काम आहे, असं म्हणत केक बनवण्यापासून ते अगदी बालपणीच्या केक भोवतीच फिरणाऱ्या आठवणी सांगेपर्यंत उत्सुकता ताणून धरणारा हा अभिनेता आहे सुव्रत जोशी. सोशल मीडिया अकाऊंटवरुन सुव्रतनं या केकची कहाणी सांगत सोबत त्याची झलकही सर्वांच्या भेटीला आणली.

नटाला दरवेळी 'नटायला' आवडेल असं नाही पण  'नटेला' आवडतच, असं लिहित सुव्रतनं आपण नटेला हेझलनट केक बनवल्याचं सांगितलं. पत्नी, अभिनेत्री सखी गोखले हिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी म्हणून त्यानं ही मेहनत घेतली.

उत्तम केक बनवणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. त्यात तंत्र आहे,पाककला आहे. त्यामुळे आज सखीच्या वाढदिवसानिमित्त काल दिवसभर...

Posted by Suvrat Laxman Joshi on Monday, July 27, 2020

थेट शेजाऱ्यांच्याच घरी जाऊन त्यानं हा केक बवनला, ज्याची चव चाखून परदेशातील मित्रांनीही त्याच्या पाककौशल्याला दाद दिली. आपल्या अनोख्या शैलीत पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुव्रतनं सखीला वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. त्याची ही 'केक'गाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.