Avengers Endgame : क्लायमॅक्स पाहताना अश्रू अनावर; तरुणी थिएटरमधून थेट रुग्णालयात

'एव्हेन्जर एन्डगेम' पाहिल्यानंतर भावूक झालेली मुलगी इतकी रडली की तिला चक्क रुग्णालयात दाखल करावं लागलं

Updated: Apr 26, 2019, 02:39 PM IST
Avengers Endgame : क्लायमॅक्स पाहताना अश्रू अनावर; तरुणी थिएटरमधून थेट रुग्णालयात title=

मुंबई : बहुप्रतिक्षित 'एव्हेन्जर एन्डगेम' आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. जगभरातून लाखो चाहते या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. 'एव्हेन्जर एन्डगेम'च्या प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कोटींच्या घरात गल्ला जमावला आहे.  'एव्हेन्जर' सीरीजचा शेवटचा भाग 'एन्डगेम'बाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 'एव्हेन्जर एन्डगेम'च्या प्रदर्शनानंतर लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकत नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. 'एव्हेन्जर एन्डगेम' पाहिल्यानंतर भावूक झालेली मुलगी इतकी रडली की तिला चक्क रुग्णालयात दाखल करावं लागल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. 

चीनमधील झेजियांग शहरात राहणारी २१ वर्षीय कॉलेज तरुणी आपल्या मित्रांसोबत 'एव्हेन्जर एन्डगेम'चा पहिला शो पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट सुरु झाल्यापासून ते संपेपर्यत ती मुलगी सतत ३ तास रडत होती. चित्रपटातील ट्विस्ट आणि क्लायमॅक्स पाहून ती मुलगी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकली नाही. ती इतकी रडली की तिला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर तिला अचानक छातीत दुखू लागले. तिची अशी अवस्था पाहून तिच्या मित्रांनी रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात गेल्यावर तिला ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. डॉक्टरांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी सतत रडल्यामुळे हाइपरवेन्टिलेशनचा त्रास झाल्याचं सांगण्यात आलं. रात्रभर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर ती मुलगी ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. 

बहुचर्चित 'एव्हेन्जर एन्डगेम'च्या आज झालेल्या प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. 'एव्हेन्जर एन्डगेम'साठी भारतात २४ तास शो लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम बॉलिवूड चित्रपटांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतातील सर्व भागात चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होत असून प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड केला आहे. चीनमध्ये पहिल्याच दिवशी चित्रपटाने ७०० कोटींचा गल्ला पार केला आहे. आता भारतातही 'एव्हेन्जर एन्डगेम' सर्व रेकॉर्ड तोडण्याची शक्यता चित्रपट समिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.