"अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर; वैभव मांगले चिंचीच्या भूमिकेत

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलत असून, अभिनेते वैभव मांगले  मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत

Updated: Apr 15, 2024, 05:16 PM IST
"अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर; वैभव मांगले चिंचीच्या भूमिकेत title=

मुंबई :  'झी मराठी' प्रस्तुत आणि राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटरची निर्मिती असलेल्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकानं सध्या रंगभूमीवर एक वेगळीच बहार आणली आहे. या सगळ्यात चिंची चेटकीण हे कॅरेक्टर खूप लोकप्रिय ठरलं आहे. हे पात्र आधी दिलीप प्रभावळकर पार पाडत होते. नंतर हे पात्र वैभव मांगलेने उचलून धरलं. त्याचं हे पात्र फार कमी वेळीत लोकप्रिय झालं. मात्र वैभवने अचानक या नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मात्र कमालीचा धक्का बसला होता.  सध्या या नाटकात निलेश गोपनारायण चिंचीची भूमिका साकारत आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांचं "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलत असून, अभिनेते वैभव मांगले  मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. पुढीलवर्षी १ मे २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. 

"अलबत्या गलबत्या" चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि न्यूक्लिअर अॅरोचे ओंकार सुषमा माने करत आहेत. भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक  नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते. "अलबत्या गलबत्या" हे नाटकही त्यापैकीच एक... या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. 

आता "अलबत्या गलबत्या" नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलत आहे. वरूणनं आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात  मुरांबा, दो गुब्बारे, एक दोन तीन चार यांचा समावेश आहे. तसेच त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. आता "अलबत्या गलबत्या" या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन नव्या रुपात चित्रपट माध्यमातून आणण्यात येणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये  असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.