भाचीच्या भेटीला आलेल्या सलमानला पाहून अर्पिता भावूक

तिने या खास क्षणांचं वर्णन तितक्याच खास अंदाजात केलं आहे. 

Updated: Jan 15, 2020, 03:59 PM IST
भाचीच्या भेटीला आलेल्या सलमानला पाहून अर्पिता भावूक  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : मागील वर्षाच्या शेवटी अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबात खऱ्या अर्थाने आनंदाची बरसात झाली. याला निमित्त ठरली ती म्हणजे या मोठ्या कुटुंबात आलेली एक छोटीशी परी. ही परी म्हणजे सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा हिची मुलगी. सलमानच्या ५४व्या वाढदिवसाच्याच दिवशी अर्पिताने एका मुलीला जन्म दिला, बस्स.... भाईजानसाठी ही सर्वात खास आणि तितकीच अनोखी भेट ठरली. 

सलमान आणि त्याच्या बहिणीचं नातं हे अतिशय खास आहे. याच खास नात्याची प्रचितीसुद्धा अनेकांना कायमच येत असते. सध्याही एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अर्पिता आणि सलमान या भाऊ- बहिणीच्या जोडीमध्ये असणाऱे नात्याचे सुरेख बंध सर्वांपुढे आले आहेत.

अर्पिताने नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये सलमान आणि त्याच्या भाचीची भेट पाहून अर्पितानेही तिच्या भावनांना शब्दांच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिल्याचं स्पष्ट होत आहे. अर्पिताने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये सलमानच्या हातांमध्ये चिमुकली आयत अतिशय निवांत झोपल्याचं दिसत आहे. तर, तिला न्याहाळताना सलमानच्या चेहऱ्यावर असणारे भावही खूप काही सांगून जात आहे. या फोटोमध्ये आणखी एक खास व्यक्तीही दिसत आहे. ती व्यक्ती म्हणजे सलमानची आई, सलमा खान. 

आपल्या जीवनातील अतिशय महतत्वाच्या अशा खास व्यक्तींनी आपल्या मुलीची भेट घेतल्याचं पाहून अर्पिताने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'या जगात मला कधीही कशाचीही भीती वाटली नाही. यामागे कारणही तसंच होतं. मला माहिती होतं की तू कायम माझ्यासोबत असशील आणि मला काहीच होऊ देणार नाहीस. आता आयतलाही अशाच सुरक्षिततेची अनुभूती होत आहे. हे हात एखाद्या दैवी शक्तीनेच पाठवले आहेत. मी तुझी खूप आभारी आहे सलमान भाई आणि माझी असामान्य आई. या दोन अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे देण्यासाठी फक्त प्रेम आहे.'

VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज

आई आणि भावाशी असणारं आपलं नातं आणि याच नात्यात आता आलेली एक नवी पाहुणी असं शाब्दिक चित्र अर्पिताने या पोस्टच्या माध्यमातून मांडलं. ज्यामुळे चाहत्यांनाही पुन्हा एकदा सलमानचं बच्चेकंपनीशी असणाऱ्या नात्याची जाणीव झाली.