मुंबई : अभिनय जगतात आपलं असं वेगळं स्थान निर्माण करत आणि कित्येक दशकं हे स्थान अबाधित ठेवत आजही एक चेहरा तितकाच यशस्वी आहे. हा चेहरा म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचा. 'महानायक', 'शहेनशहा', 'बिग बी' अशा विविध संबोधनांनी त्यांचा उल्लेख केला जातो. कलाविश्व आणि या झगमगाटाची सवय झालेल्या अमिताभ बच्चन यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात मात्र अनेक गोष्टींचा किंबहुना काही मोठ्या गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. याविषयीचाच खुलासा त्यांनी एका कार्यक्रमात केला.
आपल्या यकृताचा ७५ टक्के भाग निकामी झाल्याचं सांगत सध्याच्या घडीला नव्हे, तर जवळपास गेल्या २० वर्षांपासून आपण अवघ्या २५ टक्के यकृताच्या आधारे जीवन जगत आहोत, ही महत्त्वाची बाब त्यांनी उघड केली. 'एनडीटीव्ही'कडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधतेवेळी त्यांनी ही बाब सर्वांसमोर आणली.
'मी कायम स्वत:चं उदाहरण देतो आणि तुम्हा सर्वांनाच रोगाची चाचणी करण्याचा सल्ला देत त्याविषयी खुलेपणाने बोलण्यात कोणताही संकोचलेपणा बाळगू नका असं सांगत असतो. मी क्षयरोगातून बचावलो आहे, हॅपटायटीस बी पासून बचावलो आहे. दुषित रक्तामुळे माझ्या यकृताचा ७५ टक्के भाग निकामी झाला होता. पण, वेळीच याचं निदान झाल्यामुळे मी गेल्या वीस वर्षांपासून अवघ्या २५ टक्के यकृतावर जगत आहे', असं बच्चन म्हणाले. या साऱ्यामध्ये जीवनाकडे पाहण्याची अमिताभ बच्चन यांची साकारात्नक वृत्तीही सर्वांसमोर आली.
वयाच्या ७६ व्या वर्षीही ते आपल्या आरोग्याची बरीच काळजी घेतात. इतकच नव्हे तर, पोलिओ, हॅपटायटीस बी, क्षयरोग, मधुमेह अशा आजारांविषयी आणि इतरही आरोग्यविषयक मोहिमांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या अनेक उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो.