'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा

Pankaj Tripathi : वेब सीरिज म्हणू नका किंवा मग एखादा चित्रपट, अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या कलाकृतींबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.

सायली पाटील | Updated: Nov 8, 2023, 12:18 PM IST
'दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली', कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा  title=
Bollywood Actor Pankaj Tripathi ate only khichdi for 60 days while playing Atal Bihari Bajpayee

Pankaj Tripathi : काही कलाकार हे साचेबद्ध भूमिकांना शह देत सातत्यानं स्वत:शीच स्पर्धा करताना दिसतात. अशाच कलाकारांमधील एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं. कोणाच्याही वरदहस्ताशिवाय त्रिपाठी यांनी अभिनय क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ते एका अशा टप्प्यावर पोहोचले जिथं बॉलिवूडमधील बहुतांश चित्रपटांसाठी, सीरिजसाठी त्यांनाच पसंती मिळताना दिसते. 

मुळात सर्वसामान्यांमधूनच प्रसिद्धीझोतात आलेला एक चेहरा म्हणून त्रिपाठी यांच्याकडे पाहिलं जातं. असा हा अभिनेता घरच्या घरी तयार करण्यात आलेल्या जेवणाचा चाहता. अनेकांनीच त्यांनी याबाबत वक्तव्यही केलं आहे. पण, आता त्यांची ही आवड त्यांच्या चित्रपट कारकिर्दीवरही थेट परिणाम करताना दिसत आहे. खुद्द त्रिपाठी यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबतचा उलगडा केला. 

वाजपेयी... एक निमित्त 

रवी जाधव दिग्दर्शित 'मैं अटल हूं' या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी चित्रीकरणादरम्यान सलग 60 दिवस फक्त एकच पदार्थ खाल्ला होता. तो पदार्थ म्हणजे खिचडी. आता तुम्ही म्हणाल असं का? तर, आपण साकारत असलेल्या भूमिकेतील भावनांवर पकड मिळवण्यासाठीच त्यांनी असं केलं होतं. 

हेसुद्धा वाचा : 'टायटॅनिक 2.0' होता होता वाचलं... खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि...; Video पाहून अंगावर येईल काटा

'अटलसाठी मी जवळपास 60 दिवस चित्रीकरण केलं आणि त्या 60 दिवसांमध्ये मी फक्त खिचडी खात होतो तीसुद्धा मी स्वत: बनवलेली', असं ते म्हणाले. इतरांकडून बनवलेली खिचडी मागवणं सहज शक्य होतं पण त्यांनी तसं केलं नाही, यामागचं कारण सांगताना ते म्हणाले, 'बाकीचे तो पदार्थ कसा बनवतात हे तुम्हाला ठाऊक नसतं. मी त्यामध्ये तेल आणि मसाले वापरत नव्हतो. खिचडीसाठी मी फक्त डाळ, तांदुळ आणि सहज मिळतील अशा स्थानिक भाज्यांचाच वापर करत होतो.'

आहाराच्या सवयी आणि त्रिपाठी... 

तरुण वयात आपण चक्क समोसा खाऊनही सहजपणे अभिनय करु शकत होतो पण, आता मात्र मी अखेरचा समोसा कधी खाल्लाय हेसुद्धा माझ्या लक्षात येत नाहीये. कारण, मला आता माझं शरीर, पचनसंस्था सर्वकाही सुयोग्य ठेवण्यासाठी सात्विक आहारच घ्यावा लागतो असं म्हणत त्यांनी आपल्या आहाराच्या एकंदर सवयी सर्वांसमोर आणल्या. 

स्वत:च्या आहाराच्या सवयींबद्दल बोलत असताना त्रिपाठी यांनी सर्वच कलाकारांनाही एक सल्ला दिला. फक्त सुदृढ राहण्यासाठीच नव्हे, तर तुम्ही साकारत असणाऱ्या पात्राशी भावनिकरित्या जोडलं जाण्यासाठी योग्य आहाराच्या सवयी असणं, योग्य पदार्थ खाणंही तितकंच महत्त्वाचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. एखादं पात्र साकारत असताना योग्य भावना टीपण्यासाठी, मेंदू आणि शरीरामध्ये योग्य समतोल राखण्यासाठी अभिनेत्यांनी हलका आहार करावा, या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला. फिल्म कम्पॅनियनशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मोकळेपणानं सर्वांसमोर मांडले.