Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला 'ती' काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा.
BBC या वृत्तसंस्थेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या जहाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशानं चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जहाजाच्या खिडकीतून दिसणाऱ्या लाटा पाहणाऱ्यांच्याही पोटात खड्डा करून जात आहेत. या लाटा नव्हे, हा तर मृत्यूच आहे... अशाच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून नेटकरी देत आहेत.
समुद्राची सरासरी लाट किली उंच असते याची सर्वांनाच माहिती. पण, इथं Bay of Biscay ओलांडत असताना वादळामुळं सागा क्रुझमधून ज्या लाटा आणि समुद्राचं जे भयावह रुप दिसलं ते पाहून प्रवाशांना हा आपला अखेरचा प्रवास ठरतो की काय अशीच भीती वाटू लागली. तीन-चार नव्हे, तब्बल तीस फुटांच्या लाटा जहाजावर सातत्यानं आदळत राहिल्या आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला.
किंकाळ्या, जीव वाचवण्यासाठीची धडपड, हृदयाचे वाढलेले ठोके असंच चित्र त्यावेळी इथं पाहायसा मिळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. काही प्रवाशांनी तर, आपल्या नातेवाईकांपर्यंत या वादळाची माहिती पोहोचवत आपल्या जीवाला धोका असल्याचे संदेशही पाठवले.
24 ऑक्टोबरला दोन आठवड्याच्या प्रवासासाठी सागा क्रूझचं The Spirit of Discovery ब्रिटनहून निघालं. पण, शनिवारी मात्र या जहाजाच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवास न करण्याचा निर्णय घेत पुन्हा युकेच्या दिशेनं ते वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सागरी वादळाचा धोका पाहता हा निर्णय तातडीनं घेण्यात आला होता.
हे जहाज ज्यावेळी Bay of Biscay मधून पुढे जात होतं त्याचवेळी घोंगावणारे वारे आणि उसळणाऱ्या लाटांनी त्याला विळखा घातला. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास परिस्थिती इतकी बिघडली की, जहाजावर असणारी स्वयंचलित आपात्कालीन सुरक्षा यंत्रणाही सक्रिय झाली. जहाजावर उदभवलेली परिस्थिती इतकी वाईट होती की, जवळपास 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जहाजावर असणाऱ्या खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त पडलं. बर्फाचे मोठाले तुकडे जहाजाच्या डेकवर पडले आणि पाहणारे हे संकट कधी शमतं याचीच वाट पाहत राहिले.