सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शेखर कपूर यांच्याकडून गौप्यस्फोट

याचप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून जवळपास ३० जणांची चौकशी करण्यात आली आहे.

Updated: Jul 10, 2020, 01:43 PM IST
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शेखर कपूर यांच्याकडून गौप्यस्फोट  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दुवसांपूर्वी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतची अकाली एक्झिट ज्याप्रमाणे अनेकांच्या मनाला चटका लावून गेली, त्याचप्रमाणे अनेक अनुत्तरित प्रश्नांना वावही देऊन गेली. याचप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून जवळपास ३० जणांची चौकशी करण्यात आली आहे. ज्यामध्ये आता ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांचंही नाव जोडलं गेलं आहे. 

सुशांतला जवळून ओळखणाऱ्या काही व्यक्तींपैकी एक असणाऱ्या शेखर कपूर यांनी ईमेलच्या माध्यमातून पोलिसांत त्यांचा जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये त्यांनी गौप्यस्फोट केल्याचं म्हटलं जात आहे. कपूर यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या 'पानी' या चित्रपटासाठी सुशातनं भन्साळींचे 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' यांसारखे चित्रपट नाकारले होते. पण, दुर्दैवानं कपूर यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट काही साकारता आला नाही. याचमागचं कारण आणि सुशांत चांगल्या चित्रपटांना का मुकला यामागचं कारण कपूर यांनी जबाबात सांगितल्याचं म्हटलं जात आहे. 

'बॉलिवूड लाईफ'च्या वृत्तानुसा  'पानी' हा चित्रपट हे आपलं महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचा खुलासा कपूर यांनी केला. ज्यासाठी त्यांनी दहा वर्षे काम केलं होतं. २०१२-१३ मध्ये त्यांनी या चित्रपटाचा प्रस्ताव आदित्य चोप्रा यांच्यापुढं सादर केला. ज्यासाठी जवळपास १५० कोटींचा निर्मिती खर्च लागणार होता. अखेर २०१४ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. प्री प्रोडक्शनसाठी चित्रपटात ७ कोटी रुपये खर्चही करण्यात आले.  

सुशांतनं सुरु केलेली चित्रपटाची तयारी 

सुशांतनं या चित्रपटासाठी स्वत:ला झोकून दिलं होतं. त्यानं स्क्रीप्टचं वाचन केल्यानंतर चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली होती. तो या प्रक्रियेत इतका एकरुप झाला होता की यशराज फिल्म्सच्या अनेक बैठकांनाही त्याची उपस्थिती होती. चित्रपटाशी निगडीत प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीत तो सहभागी होऊ इच्छित होता. 

'पानी' बंद का झाला? 

क्रिएटीव्ह डिफरन्सचं कारण पुढं करत आदित्य चोप्रा यांनी हा चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला. शेखर कपूर यांना या चित्रपटात कोणताही बदल करायचा नव्हता. तर, आदित्य चोप्रा मात्र चित्रपटात्या कथेत बदल करु इच्छित होते. या दोघांमधील मतभेदांचा फटका चित्रपटाला बसला. 

शेखर कपूर यांच्यापाशी सुशांतच्या भावनांचा बांध फुटला होता 

पानी चित्रपट बंद होण्याच्या घटनेचा सुशांतवर फार परिणाम झाला होता. तो कमालीचा बेचैन झाला होता, तासनतास फोनवर रडत रहायचा असं कपूर यांनी सांगितलं. सुशांत इतका भावनिक झाला होता, की शेखर कपूर यांना भेटला तेव्हाही तो फार रडला होता. 

 

सावत्रपणाची वागणूक... 

चित्रपट बंद झाल्यानंतर शेखर कपूर लंडनला निघून गेले. पण, जेव्हा ते तेथून परतले तेव्हा सुशांतनं त्यांची भेट घेतली. त्याचवेळी यशराज फिल्म्स सोबत सुशांतनं सर्व करार संपवले असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचवेळी आपल्याला या कलाविश्वात सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याचंही सुशांत कपूर यांना म्हणाला होता. त्याच्या मनात अनेक गोष्टी दाटल्या होत्या, हेच कपूर यांनी पोलिसांत नोंदवलेल्या जबाबातून स्पष्ट होत आहे.