VIDEO : महाराजांविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या पायलचा माफीनामा, म्हणे....

हात जोडून क्षमा मागते.....   

Updated: Jun 4, 2019, 11:52 AM IST
VIDEO : महाराजांविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या पायलचा माफीनामा, म्हणे....  title=

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिनेत्री पायल रोहतगीने एक पोस्ट केली होती ज्यामध्ये तिने महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत असं म्हटलं होतं. महाराजांचा जन्म हा शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता, असंही ती म्हणाली होती. ज्यानंतर या मुद्द्यावरुन तिने एका नव्या वादाला तोंड फोडलं. 

सोशल मीडियावर आपल्या वाचनात आलेल्या एका विषयाचा संदर्भ देत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरुन पायलवर अनेकांनीच शाब्दिक हल्ला चढवला. आपल्या वक्तव्याला आणि पोस्टला होणारा हा विरोध पाहता अखेर तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचीच माफी मागितली आहे. 

'मी तुमची हात जोडून माफी मागते....', असं ती या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावरुण आपल्याला होणारा विरोध पाहता, नेटकऱ्यांलेखी आपलं काहीच अस्तित्वं नसून, कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यास आपण पात्र नसल्याची खंत तिने व्यक्त केली. सोबतच भारत देशात कोणा एका व्यक्तीला साधं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही नाही, ही बाब अधोरेखित करत तिने वारंवार झाल्या प्रकाराविषयी सर्वांची माफी मागितली आहे. 

आपल्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर केलं गेलं आहे, असं म्हणत मी स्वत:सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करते हेच ती म्हणत आहे. वाचनात आलेल्या एका गोष्टीचा संदर्भ आणि त्याविषयी मी एक प्रश्न विचारला. पण, सोशल मीडियाच्या या विश्वात सर्वांमध्येच इतकी घृणा आणि संताप आहे की जे इतरांची खिल्ली उडवण्याव्यतिरिक्त काहीही करत नाहीत, असं ती म्हणाली. यावेळी आपल्या एका विधानावरुन निर्माण झालेल्या तणावाच्या आणि वादाच्या परिस्थितीची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. 

शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र शेतकरी कुटुंबात झाला होता- पायल रोहतगी

पायलने त्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं? 

'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शूद्र जातीतील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. मात्र, राज्याभिषेकासाठी त्यांची विधिवत मुंज करण्य़ात आली आणि त्यांनी आपल्या पत्नीशी पुनर्विवाह केला होता. यावरून एकच सिद्ध होते की, त्याकाळी जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. तुम्हाला एखादं कौशल्य अवगत असल्यास तुम्ही एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकत होतात', असे पायलने ट्विटमध्ये म्हटलं होतं.