शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र शेतकरी कुटुंबात झाला होता- पायल रोहतगी

राज्याभिषेकासाठी त्यांनी विधिवत मुंज केली आणि आपल्या पत्नीशी पुनर्विवाह केला.

Updated: Jun 4, 2019, 07:48 AM IST
शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र शेतकरी कुटुंबात झाला होता- पायल रोहतगी title=

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, त्यांचा जन्म हा शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता, असे वक्तव्य करून बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने नव्या वादाला तोंड फोडले आहे. पायलने १ जून रोजी यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता. मात्र, राज्याभिषेकासाठी त्यांनी विधिवत मुंज केली आणि आपल्या पत्नीशी पुनर्विवाह केला. यावरून एकच सिद्ध होते की, त्याकाळी जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. तुम्हाला एखादे कौशल्य अवगत असेल तर तुम्ही एका वर्णातून दुसऱ्या वर्णात जाऊ शकत होतात, असे पायलने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पायलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या सगळ्यामागे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे तिने म्हटले आहे. केवळ सत्य जाणून घेणे हा माझा उद्देश आहे. शिवाजी महाराज हे एक महान हिंदू सम्राट होते. मात्र, या सगळ्यामुळे हिंदू समाजाच्या मनात असणाऱ्या त्यांच्या अढळ स्थानाला कधीही धक्का लागणार नाही. पंरतु, या गोष्टींवरून सिद्ध होते की, धर्माच्या नावाखाली अनेक वर्षे आपली दिशाभूल करण्यात आली, असेही पायलने म्हटले आहे. तसेच तिने मराठा आरक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वक्तव्यानंतर पायलवर टीकेची झोड उठली आहे.