'ठाकरे'च्या पोस्टरसाठी जागा नाही, आंदोलकांनी थांबवला चित्रपटाचा शो

'ठाकरे'चं पोस्टर न दिसल्यामुळे शिवसैनिक नाराज

Updated: Jan 25, 2019, 09:51 AM IST
'ठाकरे'च्या पोस्टरसाठी जागा नाही, आंदोलकांनी थांबवला चित्रपटाचा शो  title=

नवी मुंबई : बहुचर्चिच 'ठाकरे' चित्रपटाच्या पोस्टरला चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील वाशी येथे घडली. वाशी येथे असणाऱ्या आयनॉक्समध्ये 'ठाकरे' सिनेमा पाहण्यासाठी शिवसैनिक गेले होते. त्यावेळीच हा गोंधळ पाहायला मिळाला. 

आयनॉक्समध्ये दर्शनी भागात इतर सर्व चित्रपटांचे पोस्टर होते, पण तिथे 'ठाकरे'चं पोस्टर न दिसल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यानंतर नाराजी व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी सकाळी ८ वाजताचा 'ठाकरे' चित्रपटाताचा शोसुद्धा थांबवला. शिवाय आयनॉक्स प्रशासनाला धारेवर धरत चित्रपटाचं पोस्टर का लावलं नाही, याचा जाबही विचारला. 

दरम्यान, 'ठाकरे'च्या स्पेशवल स्क्रिनिंगमध्येही मानापमान नाट्य पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात काहीसे मतभेद पाहायला मिळाले. 

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर 'ठाकरे'तून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीपासूनच त्याविषयीच्या बऱ्याच चर्चा आणि कुतूहलाचं वातावरणही पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे एकिकडे 'ठाकरे' प्रदर्शित झाला असून, दुसरीकडे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' हा चित्रपटही प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपचटांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे. 

स्क्रिनिंगमध्ये नेमकं काय झालं होतं? 

‘ठाकरे’चित्रपटाचं खास स्क्रिनिंग सुरू होतं. यावेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे हे उशिरा पोहोचले. त्यावेळी चित्रपटगृहात फारच गर्दी होती. पानसे हे सहकुटुंब स्क्रिनिंगसाठी आले होते. पण, त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने ते तडकाफडकी त्या ठिकाणहून निघून गेले, असं काहींचं म्हणणं आहे. तर, पानसे हे अपमानित झाल्याने तेथून उठून गेल्याचंही सांगण्यात येत आहे.