कोण म्हणतं, टिव्ही पाहून चांगली नोकरी मिळत नाही; एका चित्रपटामुळं तो झाला IPS अधिकारी

सनी देओलनं साकारलेल्या भूमिकेपासून या व्यक्तीनं प्रेरणा घेतली

Updated: Jan 19, 2022, 04:31 PM IST
कोण म्हणतं, टिव्ही पाहून चांगली नोकरी मिळत नाही; एका चित्रपटामुळं तो झाला IPS अधिकारी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : IPS अधिकारी होण्यासाठी जबरदस्त अभ्यास, एकाग्रता, जिद्द आणि चिकाटी या साऱ्याची नितांत गरज असते. अर्थात असते. ही बाब कोणी नाकारलीच नाहीये. पण, काही माणसं मात्र याला अपवादही ठरतात. सध्या चर्चा होतेय अशाच एका व्यक्तीची. 

जिथं अनेकजण टीव्ही पाहू नको, सिनेमा पाहू नको असं सांगत फक्त आणि फक्त अभ्यासच कर, असा सल्ला या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना देत असतात, तिथे एकानं जरा चौकटीबाहेर जात बाजी मारली आहे. 

सनी देओलनं साकारलेल्या भूमिकेपासून या व्यक्तीनं प्रेरणा घेतली, अभ्यास केला आणि मेहनतीनं पोलीस खात्यात तो नोकरीला लागला. 

'इंडियन' हा चित्रपट पाहून जयपूरमधील एका खेड्यातील मनोज रावत यानं अशी काही प्रेरणा घेतली की, आयपीएस अधिकारी होऊनच ते शांत बसले. 

19 व्या वर्षी पोलिसांत नोकरी... 
मनोज यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना चित्रपट पाहण्याची विशेष आवड. चित्रपटांनीच त्यांना या पोलीसांच्या नोकरीकडे आकर्षित केलं. 

शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आर्थिक कारणांमुळे कॉन्स्टेबलची नोकरी स्वीकारली. अवघ्या 19 व्या वर्षी ते राजस्थान पोलिसांच्या सेवेत रुजू झाले. 

शिक्षण सुरुच ठेवलं. पॉलिटीकल सायन्स या विषयातून त्यांनी स्नातक पदवी घेतली. पुढे क्लर्क पदावर नोकरी सुरु केली. 

नागरी सेवांच्या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी ही नोकरीसुद्धा सोडली. परीक्षेच्या तयारीदरम्यानच त्यांना CISF मध्ये रुजू होण्याची संधी चालून आली होती. 

त्यांनी ही नोकरीसुद्धा नाकारली. कारण, आता त्यांना एकच लक्ष्य दिसू लागलं होतं. 

पोलिसांत असतानाच पाहिलेला 'इंडियन'
खुद्द मनोज सांगतात, की त्यांनी पोलिसांत नोकरी करत असतानाच 'इंडियन' हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतरच आपण आयपीएस अधिकारी व्हायचं हा निर्धार त्यांनी केला. 

ठरवलेलं ध्येय्य गाठण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली. अखेर 2017 मध्ये रावत यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत मोठं यश मिळवलं. 

संपूर्ण देशात त्यांनी 824 वं स्थान मिळवलं. जवळपास 35 मिनिटांच्या प्रत्यक्ष मुलाखतीनंतर त्यांना आयपीएस या पदावर सेवेत घेण्यात आलं. 

यशाच्या प्रत्येक मार्गावर काही टप्पे येतात. या आयपीएस अधिकाऱ्याच्या मार्गावर आलेला टप्पा जरा नाही फारच फिल्मी होता, म्हणूनच की काय त्यांच्या करिअरचा चित्रपटही सुपरहिटच ठरला असं म्हणायला हरकत नाही.