'हिरो नंबर 1'च्या शूटिंगवेळी 3 दिवस गायब होता गोविंदा? निर्मात्याच्या आरोपावर अभिनेत्याच्या टीमने दिले उत्तर

आता तब्बल 26 वर्षांनी वाशू भगनानीने गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी एक किस्साही सांगितला

नम्रता पाटील | Updated: Apr 7, 2024, 04:11 PM IST
'हिरो नंबर 1'च्या शूटिंगवेळी 3 दिवस गायब होता गोविंदा? निर्मात्याच्या आरोपावर अभिनेत्याच्या टीमने दिले उत्तर title=

Govinda Hero No 1 Vashu Bhagnani : बॉलिवूडचा हिरो अशी ओळख असलेला अभिनेता गोविंदा हा कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. गोविंदाने 80 ते 90 च्या दशकात अभियनाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. गोविंदाला त्याच्या डान्सिंग स्टाईलसाठी ओळखले जाते. गोविंदाने 1997 मध्ये हिरो नंबर 1 या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवनने केले होते. तर याची निर्मिती वाशू भगनानी यांनी केली होती. आता तब्बल 26 वर्षांनी वाशू भगनानीने गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल भाष्य केले आहे. 

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी हे सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. वासू यांनी यानिमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गोविंदाच्या टीमवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  यावेळी त्यांनी एक किस्साही सांगितला. आम्ही 'हिरो नंबर 1' या चित्रपटाचे स्वित्झर्लंडमध्ये शूटींग करत होतो. त्यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम याठिकाणी उपस्थित होती. आम्ही सर्वजण गोविंदाची वाट पाहत होतो. आम्ही तीन दिवसांचे वेळापत्रक तयार केले होते. पण गोविंदा दोन दिवस उशिरा आला होता, असे वाशू भगनानी यांनी सांगितले. 

गोविंदाचा मॅनेजरकडून स्पष्टीकरण

वाशू भगनानीच्या या विधानावर आता गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशी सिन्हा यांनी ई-टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, "त्यावेळी असे काहीही घडले नव्हते. मी गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदासोबत काम करत आहे. तो कधी कधी दोन-तीन तास उशिरा पोहोचतो. त्यामागेही त्याची तब्ब्येत किंवा विमानाला झालेला विलंब कारणीभूत असतो. पण तो दोन दिवस एखाद्या शूटींगसाठी लेट पोहोचला असं कधीही झालेले नाही. गोविंदा आपल्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहे, असे वासू भगनानींदेखील कबूल केले आहे. तो आपले काम लवकर पूर्ण करणाऱ्यांपैकी आहे. 

आम्ही सर्वजण वासू सरांचा खूप आदर करतो. आम्ही सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत खूप काम केले आहे. या गोष्टीला अनेक वर्षे उलटली आहेत, त्यामुळे आता त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि जर खरंच काही गोष्ट असेल तर आम्ही त्यावर बसून बोलायला तयार आहोत", असे गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हांनी म्हटले. 

'हिरो नंबर 1' वेळी नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान वाशू भगनानीचा 'हिरो नंबर 1' हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एक गाणे स्वित्झर्लंडमध्ये शूट झाले आहे. या गाण्याच्या शूटींगदरम्यान चित्रपटाच्या टीममधील 75 लोक गोविंदाची वाट पाहत होते. पण तो आलाच नाही. अखेर 3 दिवस उलटल्यानंतर वासू भगनानी यांनी स्वतः गोविंदाला फोन केला आणि त्याला तो येतो आहे की नाही, जर तू येत नसशील तर आम्ही पुन्हा भारतात येतो, असे सांगितले. पण गोविंदा हे ऐकल्यानंतर दुःखी झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 चे फ्लाईट पकडून तो स्वित्झर्लंडला पोहोचला. मी स्वत: त्याला विमानतळावर घ्यायला गेलो होतो. यानंतर एका दिवसात गोविंदाने 70 टक्के काम पूर्ण केले होते. यामुळे निर्माते खूप खुश झाले, असा किस्सा वाशू भगनानी यांनी सांगितला.