Goldy Brar news : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंडची गोळ्या झाडून हत्या, 'या' गँगने घेतली जबाबदारी

Goldy Brar Death In America : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकं काय झालं?   

सौरभ तळेकर | Updated: May 1, 2024, 08:10 PM IST
Goldy Brar news : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंडची गोळ्या झाडून हत्या, 'या' गँगने घेतली जबाबदारी title=
Goldy Brar Death In America

Goldy Brar Death : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu moosewala) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याची (Goldy Brar Death) अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन न्यूज चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी गोल्डी ब्रार याची हत्या झाली. डल्ला-लखबीर गँगने या हत्येची जबाबदारी घेतली असून यावर अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे आता पंजाबच्या गुन्हेगारी (Panjab Crime News) विश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. 

सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर गोल्डी ब्रार याचं नाव चर्चेत आलं. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं होतं. पंजाब युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नेता गुरलाल ब्रार यांची 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री चंदीगडमधील एका क्लबबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा गुन्हेगारी विश्वात होऊ लागली. पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोत येथील रणजित सिंग उर्फ ​​राणा सिद्धूच्या हत्येतही गोल्डी ब्रारचा हात होता, अशी चर्चा देखील झाली होती.

गँगस्टर गोल्डी ब्रारने (Goldy Brar) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपणच सिद्धूी मुसेवालाची हत्या केल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलीस तपासात देखील गोल्डी ब्रारचं नाव समोर आलं. "सिद्धू मुसेवाला हा फार इगो असलेला व्यक्ती होता. त्याने त्याच्या राजकीय आणि आर्थिक सामर्थ्याचा चुकीचा वापर केला. त्याला धडा शिकवणं आवश्यक होतं आणि तो त्याला शिकवला," असं गोल्डीने म्हटलं होतं. त्यावेळी त्याने सलमान खानला देखील धमकी दिली होती. सलमानला संपवणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे असंही गोल्डीने या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.  

दरम्यान, एकीकडे सलमान खानच्या दुश्मानाचा खात्मा झालाय. तर मुंबईमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात चौकशीत असलेला आरोपी अनुज थापन याने आत्महत्या केली आहे. पोलिसा कोठडीत असताना त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीये. त्यावर आता सीआयडी चौकशी करणार आहे. लॉकअपमध्ये अनुजने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपी अनुज थापन लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात होता. मुंबई पोलिसांनी अनुजला पंजाबमधून अटक केली होती.