रेहमाननेही केला होता आत्महत्येचा विचार

जाणून घ्या त्यामागचं मुख्य कारण  

Updated: Nov 6, 2018, 02:38 PM IST
रेहमाननेही केला होता आत्महत्येचा विचार title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कलाविश्वाचं आणि संपूर्ण देशाचं नाव उज्वल करणाऱ्या ए.आर.रेहमान यांनीही एकेकाळी अपयशाचा आणि नैराश्याचा सामना केला होता. त्यांच्या वाट्याला सध्या आलेलं यश पाहता अनेकांनाच या साऱ्याचा हेवा वाटत असला तरीही खुद्द रेहमान यांनी मात्र कोणी विचारही केला नसावा अशा परिस्थितीचा सामना केला आहे. 

जीवनातील एका वळणावर त्यांच्या मनात आत्महत्येच्या विचारांनी घर केलं होतं. त्याविषयीच सांगत रेहमान म्हणाले, 'वयाच्या २५ व्य़ा वर्षापर्यंत मी आत्महत्येचा विचार करत होतो. आपल्यातील कित्येकांना त्यांच्याच असणाऱ्या चांगल्या गोष्टींची जाण नसते. आपल्याच काहीच चांगलं नाही, असंच त्यांना वाटत असतं. त्यातच मी वडिलांना गमावलं होतं. त्यामुळे माझ्या मनात बरेच असे विचार होते, जे माझं खच्चीकरण करत होते.'

आपल्या वाटेत आलेल्या याच प्रसंगांमुळे खऱ्या अर्थाने आपण धीट झाल्याचं ते 'पीटीआय'शी स्वाद साधताना म्हणाले. 'मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे. त्यामुळे घाबरून का जगावं', असा विचारही त्यांनी मांडला. 

वयाच्या ५१ व्या वर्षी रेहमान यांनी स्वत:चा स्टु़डिओ सुरु केला. पण, त्यापूर्वी मात्र परिस्थिती आपल्या पारड्य़ात कधीच नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. 'वडील सोबत नव्हते, त्यावेळी हाताशी ३५ चित्रपट असूनही मी फक्त त्यातील दोनच चित्रपट करु शकलो होतो. मी कसा तग धरणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. तुझ्याकडे सारंकाही आहे, त्याचा वापर कर असा सल्लाही मला देण्यात आला. तेव्हा मी २५  वर्षांचा होतो', असं म्हणत आपण मात्र काही वेगळंच इच्छित होतो याचा खुलासा त्यांनी केला. 

अतिशय कमी वयात मोठ्या जबाबदाऱ्या घेत आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी मिळवल्या होत्या. १२ ते २२ या वयोगटातच त्यांनी कारकिर्दीत बऱ्याच गोष्टी साध्य केल्या होत्या. पण, पुढे जाऊन मात्र हे सारंकाही त्यांच्यासाठी कठिण होऊन बसलं होतं. त्यामुळे या गोष्टी पुढे न करण्याचा विचारही त्यांच्या मनात घर करुन होता. 

आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत, त्यातून वाट काढत यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या रेहमान यांनी या मुलाखतीत आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. ज्यामध्ये आत्महत्येच्या विचारापासून त्यांच्या खऱ्या नावापर्यंतचा समावेश आहे.