'खंडोबा' देवदत्त नागेच्या सिनेमाचं पोस्टर लाँच

झी मराठीवरील 'जय मल्हार लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका खंडोबा म्हणजे देवदत्त नागे. या देवदत्त नागेचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लाँच झालं. 'चेंबूर नाका' असं या सिनेमाचं नाव आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 14, 2017, 12:53 PM IST
 'खंडोबा' देवदत्त नागेच्या सिनेमाचं पोस्टर लाँच title=

मुंबई : झी मराठीवरील 'जय मल्हार लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका खंडोबा म्हणजे देवदत्त नागे. या देवदत्त नागेचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लाँच झालं. 'चेंबूर नाका' असं या सिनेमाचं नाव आहे. 

साक्षी व्हिजन प्रॉडक्शनच्या बेनरखाली बनणाऱ्या डॉ. सीमा नितनवरे आणि देवदत्त नागे यांची निर्मिती असलेल्या ‘चेंबूर नाका’ या आगामी मराठी चित्रपटात देवदत्त एका नव्या रूपात मराठी रसिकांना दिसणार असून नितेश पवार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘चेंबूर नाका’ या चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन नुकतेच जे.के. बेक्वेट्स, प्रभादेवी येथे केंद्रिय सामाजिक व न्याय मंत्री मा. खा. श्री. रामदासजी आठवले, गोस्वामी श्री नीरजकुमारजी महाराज, सुवर्णाताई डंबाळे  आणि उपस्थित पत्रकारांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी तसेच मराठी व हिंदीचित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होती.

 
मराठी मालिका विश्वातील मैलाचा दगड ठरावा अशी ‘जय मल्हार’ ही मालिका केल्यानंतर देवदत्त नेमक्या कोणत्या रूपात समोर येणार हे कोडं त्यांच्या चाहत्यांना पडलं होतं. याच कारणामुळे देवदत्त यांनीही अगदी निवडक चित्रपटांना प्राधान्य देत ‘चेंबूर नाका’ हा एका आगळया वेगळया विषयावरील चित्रपट निवडला आहे. या चित्रपटात देवदत्त यांनी दत्ता नांगरे नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.‘जय मल्हार’ नंतर पुढे काय हा प्रश्न इतरांप्रमाणे देवदत्त यांच्या समोरही होता, पण येणारा प्रत्येक सिनेमा न स्वीकारता राजहंसाप्रमाणे चोखंदळ राहात त्यांनी आशयघन चित्रपटांचा स्वीकार करीत दिग्दर्शक नितेश पवार यांच्या ‘चेंबूर नाका’ची निवड केली. 

या चित्रपटाच्या विषयासोबतच त्यातील धडाकेबाज व्यक्तिरेखा भावल्याचं देवदत्त मानतात. आजच्या काळातील प्रेक्षकांना प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळ, पण वास्तवतेचं भान राखणारं हवं असल्याचं देवदत्त यांचं मत आहे. ‘चेंबूर नाका’ हा चित्रपट याच वाटेने जाणारा असल्याने त्याला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता असंही देवदत्त म्हणतात. एक्शन आणि इमोशनने भरपूर अशा या चित्रपटातील सहकलाकारांची टिमही आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी सक्षम असल्याने काम करताना समाधान लाभत असल्याचं देवदत्त यांचं म्हणणं आहे.