लागिरं झालं जी : शितली पुन्हा कॉलेजला जायला सुरूवात करेल का?

मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ९ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात जयडी आणि पुष्पा मामीपासून झाली. दोघीही शीतलची चर्चा करीत असतात. तेव्हा पुष्पा शीतलच्या कुटूंबाला बाहेर काढल्याचा सारा प्रकार जयडीला सांगत असते. दरम्यान शीतलला घराबाहेर कधी काढणार हे जयडी पुष्पाला विचारते. तेवढ्यात जीजी तेथे येऊन पुष्पाने शीतलचे घर वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी शाबासकी देते आणि तुझा फार अभिमान वाटतो असे सांगून निघून जाते. जी जी निघून गेल्याने पुष्पा आणि जयडी एकमेकींकडे बघून भोळचटपणे हसतात. तिकडे अज्या डायरी लिहायला घेत असतो एवढ्यात राहुल्या त्याला फोन करून शीतलच्या घरावर जप्ती आल्याची खबर सांगून टाकतो.

ते ऐकून अज्या शीतलच्या घरच्यांच्या काळजीने व्याकुळ होतो आणि शीतलने ही गोष्ट न सांगितल्याने फार चिडतो. दरम्यान आपली जीत झाली या आनंदाने भय्यासाहेब आणि त्यांचे मित्र पार्टी करीत शीतलचे जिणे कसे हराम करता येईल याची शक्कल लढवत असतात. घरी परतल्यावर शीतल अज्याला फोन करते पण त्याला जप्ती आल्याचे काहीच सांगत नाही. तेव्हा अज्या स्वतःच शीतलला म्हणतो, घरावर जप्ती आली हे राहुल्या कडून कळावं? तेव्हा शीतल आपले अश्रू आवरत अज्याला आपले दुःख कळू देत नाही. मग अज्या सर्वांची विचारपूस करतो. तेव्हा अज्या म्हणतो तू तुझ्या घरच्यांची काळजी घे आणि नानांसारखी वेळ तुझ्यावर मी येऊ देणार नाही. आपण आपलं हक्काचं घर घेऊ असेही सांगतो आणि फोन ठेवतो.

दरम्यान रात्री आर्मी केम्पमध्ये सारे जवान एकमेकांच्या ओळखी पटवून घेऊन आपापल्या घरची परिस्थिती जाणून घेत असतात. तेवढ्यात जयडी शीतलच्या फोनवरून अज्याला फोन करते आणि प्रेमळपणे बोलत असते तेवढ्यात जयडी समोर शीतल येते आणि जयडीच्या चेहऱ्यावरील रंग उडतात. मग जयडी शीतलकडे फोन देऊन समोरच उभी राहते. तेव्हा शीतलला जयडीपुढं व्यवस्थित अज्याशी बोलता येत नाही. शीतल सरळ बोलत नसल्याने अज्या फोन कट करतो. शीतल फोन करते न करते तोवर जयडी तिला म्हणते आज पासून मी तुझ्याच रूममध्ये झोपणार आहे. ते ऐकताच आता नवऱ्याशी जयडी समोर कसे बोलायचे या विचाराने निराश होते. दिवसभर अनेक कामांमुळे अज्याशी बोलता येत नसल्याने रोज रात्री बोलणारी शीतल, खोलीत जयडी झोपल्यावर अज्याशी बोलायची कोणती युक्ती काढणार हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.