एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात

लतादीदी यांनी एक काळ गाजवला, त्या खऱ्या अर्थानं सम्राज्ञी ठरल्या. असं असतानाच एक टप्पा असा आला, की त्यांचं आणि बहीण, गायिका आशा भोसले यांचं नातं तणावाच्या वळणावर आलं होतं. 

Updated: Feb 6, 2022, 12:04 PM IST
एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात title=

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आजारपणाशी असणारी झुंज अखेर संपली. एक काळ संपला.... असंच म्हणत सध्या दीदींच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं जात आहे. असं असतानाच त्यांच्या काही  आठवणींनाही उजाळा दिला जात आहे. लतादीदी यांनी एक काळ गाजवला, त्या खऱ्या अर्थानं सम्राज्ञी ठरल्या. असं असतानाच एक टप्पा असा आला, की त्यांचं आणि बहीण, गायिका आशा भोसले यांचं नातं तणावाच्या वळणावर आलं होतं. 

दीदी आणि आशाताईंच्या नात्यात तणाव येण्यामागचं कारणंही तसंच होतं. अतिशय कमी वयातच लता दीदींवर कुटुंबाची जबाबदारी आली. वडिलांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या आधारस्थानी आल्या. यातच त्यांची भावंड मोठी होत होती. आशाताई जेव्हा मोठ्या झाल्या तेव्हा दीदींच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या. पण, आशाताईंचा स्वभाव वेगळा. 

बंधनांचे पाश, साचेबद्ध गोष्टींपासून त्या दूरच असायच्या. त्यांनी आपल्या वेगळ्या वाटा निवडण्यास सुरुवात केली.16 व्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं. असं म्हटलं जातं की, गणपतराव हे लता दीदींचे सेक्रेटरी होते. त्यांचं वय त्यावेळी 31 वर्षे आणि आशा भोसले यांचं अवघं 16 वर्षे. आशाताईंचा हाच निर्णय दीदींना खटकला. दोन्ही बहिणींमध्ये दुरावा आला. आशाताईंनी कुटुंबाशीही दुरावा पत्करला आणि त्यांनी वेगळं आयुष्य सुरु केलं. दीदींना आपल्या बहिणीचं गणपतरावांशी असणारं नातं कधीच पटलं नाही. 

ते आपल्या बहिणीच्या योग्य नाहीत हीच भीती त्यांना सतावत होती आणि शेवटी मनातली भीती खरी ठरली. आशा भोसले आणि गणपतराव यांना तीन मुलं झाली. पण, पुढे त्यांच्याच इतके मतभेद झाले की हे नातं अतिशय वाईट वळणावर येऊन संपलं. 

पुढे आशा भोसले आणि गणपतराव वेगळे झाले. त्यांचं आडनाव मात्र आशाताईंनी आपल्यासोबतच ठेवलं पण, दीदींसोबतचा त्यांचा दुरावा तरीही संपला नव्हता. दोघीही दरम्यानच्या काळात हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये नावाजल्या जाऊ लागलेल्या.

पाहता पाहता अखेर काळ पुढे गेला आणि नात्याममध्ये असणारी ही कटुता कमी होऊ लागली.