ओम फट स्वाहा!!! तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'झपाटलेला 3'चा पहिला लूक समोर

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार असून  'झपाटलेला 3' हा 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 17, 2024, 07:06 PM IST
ओम फट स्वाहा!!! तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'झपाटलेला 3'चा पहिला लूक समोर title=

Zapatlela 3 First Look Poster : 'ओम भग भुगे भग्नी भागोदरी, ओम फट स्वाहा...' हे वाक्य ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर तात्या विंचू उभा राहतो. 1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'झपाटलेला' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. तर या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे प्रमुख भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. महाराष्ट्रातील लाखो रसिक प्रेक्षकांना या मंत्रोच्चाराचे वेड लावणारा तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अभिनेता आदिनाथ कोठारेने 'झपाटलेला 3' या चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे पहिले पोस्टरही समोर आले आहे. आदिनाथ कोठारेने इन्स्टाग्रामवर 'झपाटलेला 3' या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या कॅप्शन देताना आदिनाथने "हो हे खरं आहे !!! हो खरंय !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ चित्रपटगृहात ! ओम फट स्वाहा !!!", असे त्याने म्हटले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर एका बाजूला आदिनाथ कोठारे आणि दुसऱ्या बाजूला डोक्यावर गोळी लागलेला तात्या विंचू दिसत आहे. 

'झपाटलेला, मी तात्या विंचू...' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती रजनीश खनुजा, महेश कोठारे हे करणार आहेत. हा चित्रपट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना 'झपाटलेला 3'ची घोषणा केली होती. त्यानंतरच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची चर्चा रंगली होती. अखेर आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर अनेक कलाकारांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. अभिनय बेर्डे, वैभव तत्त्ववादी, मंजिरी ओक या कलाकारांनी यावर कमेंट करत आदिनाथला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक चाहत्यांनी आम्ही हा चित्रपट नक्कीच पाहणार अशा कमेंट केल्या आहेत.