मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमधील भांडण 20 वर्षांनी अखेर मिटलं; गळाभेट घेत संपवली कटुता

मर्डर चित्रपटानं इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या वादामुळे तब्बल 20 वर्षं दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. पण अखेर त्यांच्याती वाद मिटला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 12, 2024, 05:17 PM IST
मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमधील भांडण 20 वर्षांनी अखेर मिटलं; गळाभेट घेत संपवली कटुता title=

मर्डर चित्रपटामुळे इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 2004 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यामधील किसिंग, बोल्ड सीन आणि गाणी यांची एकच चर्चा रंगली होती. पण याच चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये वाद झला होता. हा वाद इतका मोठा होता की, दोघांनी एकमेकांशी बोलणंही बंद केलं होतं. पण अखेर 20 वर्षांनी दोघांनी आपापसातील हा वाद मिटवला आहे. दोघे अभिनेते चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी पोहोचले होते. यावेळी एकमेकांसमोर आले असता दोघांनी गळाभेट घेत कटुता संपवली. 

इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पार्टात दोघांनी मीडियासमोर पोझही दिली. मल्लिका शेरावतने यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता, तर इम्रान हाश्मी काळ्या सूटमध्ये होता. 

या फोटो सेशनआधी इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत एकमेकांशी गप्पा मारत होते. यावेळी त्यांनी फोटोग्राफर्ससह मस्करीही केली. दरम्यान इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावतच्या फोटोंमुळे अनेकांना जुना काळ आठवला आहे. अनेकांनी दोघांना एकत्र पाहून आनंद व्यक्त केला आहे.

दोघांचे फोटो, व्हिडीओ पाहून एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'फार वेळ वाट पाहिलेली रियुनिअन'. तर एकाने लिहिलं आहे की, 'अखेर त्यांनी त्यांच्यातील वाद मिटवला'. दरम्यान एकाने, अद्यापही दोघे चांगले दिसत असून त्यांना एखाद्या चित्रपटात घ्या अशी इच्छा व्यक्त केली आहे. एकाने हे सर्वोत्तम ऑन स्क्रीन कपल असल्याचं म्हटलं आहे.
 
2004 मध्ये मर्डर चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रचंड गाजला होता. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. 2021 मध्ये मंदिरा बेदीला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका शेरावतने इम्रान हाश्मीसोबतचा वाद फारच बालिश असल्याचं म्हटलं होतं. मल्लिका म्हणाली होती की, "इम्रान हाश्मीसह सर्वात हास्यास्पद बाब आधी आणि नंतर होती. आम्ही अजिबात बोलत नव्हतो आणि आता ते फारच बालिश वाटत आहे. मला वाटतं शुटिंग संपल्यानंतर प्रमोशन करत असताना आमच्यात काहीतरी गैरसमज झाला होता. माझ्याकडून ते फारच बालिश होतं".

दुसरीकडे इम्रान हाश्मीने मल्लिकाबाबत विधान करत वाद निर्माण केला होता. त्याने मल्लिका शेरावत वाईट किस करणारी असल्याचं म्हटलं होतं. तसंच तिला हॉलिवूडमध्ये करिअर करण्यावरुन टोला लगावला होता. दरम्यान मल्लिकाने याचं उत्तर देताना हिस चित्रपटात इम्रान हाश्मीच्या तुलनेत सापाने चांगला किस केल्याचं म्हटलं होतं. 2 एप्रिलला मर्डर चित्रपटाला 20 वर्षं पूर्ण झाली.