'मणिकर्णिका....'तील भूमिकेनंतर वैभवची नवी इनिंग

विविध भूमिका साकारत मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत आहे. 

Updated: Dec 23, 2018, 07:53 AM IST
'मणिकर्णिका....'तील भूमिकेनंतर वैभवची नवी इनिंग  title=

मुंबई : 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात 'चिमाजी आप्पा' ही भूमिका साकरल्यानंतर अभिनेता वैभव तत्ववादीच्या वाट्याला आणखी एका ऐतिहासिक पटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. विविध भूमिका साकारत मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत आहे. येत्या काळात तो अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटातून झळकणार आहे. 

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्य तुकडीतील एका शूरवीर योद्ध्याच्या भूमिकेत तो झळकणार आहे. 'पूरणसिंग' असं तो साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचं नाव असून, अभिनेत्री अंकिता लोखंडे चित्रपटात त्याच्या पत्नीची म्हणजेच झलकारी बाईची भूमिका साकारत आहे.

वैभव त्याच्या या नव्या भूमिकेसोबतच चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या आणखी एका नव्या इनिंगमुळे. आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारा वैभव आता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. त्याने आपल्या निर्मितीसंस्थेची स्थापना केली असून, 'ऑटम ब्रीझ फिल्म्स' असं त्याच्या निर्मितीसंस्थेचं नाव आहे. या संस्थेअंतर्गत सिनेमाच्या निर्मिती ते व्यवस्थापन अशी कामं पार पडणार आहेत.

 
 
 
 

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

अभिनय आणि या नव्या निर्मिती संस्थेची कामं अशा सर्व गोष्टींची जबाबदारी पार पाडत वैभव त्याचं वेगळेपण कसा सिद्ध करतो हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, कंगनासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळालेला वैभव या संधीचंही सोनं करतो का आणि त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.